एसीबीच्या धडाक्याने अखेर न्यायाचा मार्ग मोकळा; ट्रॅक्टर मालकाला दिलासा!
भद्रावती, न्यूज डेस्क ✍️
Shankar Borghare, 95 25 61 25 55
भारत बोढेकर यांच्या ट्रॅक्टर प्रकरणाला अखेर शुक्रवारी सायंकाळी सुखद वळण मिळाले. अनेक दिवसांपासून वन विभागाच्या ताब्यात असलेला ट्रॅक्टर अखेर सोडण्यात आला. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बोढेकर कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.
या संपूर्ण प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बजावलेली भूमिका विशेष उल्लेखनीय ठरली. संबंधित प्रकरणात एसीबीने कारवाई केल्यानंतर पुढील घडामोडींना वेग आला. त्यानंतर एसीबीच्या चंद्रपूर येथील विशेष अधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत ट्रॅक्टर मालकाला मदत केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
अपंग वडील, वृद्ध आई आणि घरातील एकमेव कमावता सदस्य असलेल्या भारत बोढेकर यांच्यासाठी हा ट्रॅक्टर केवळ वाहन नव्हता, तर शेती आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आधार होता. त्यामुळे ट्रॅक्टरची सुटका होणे म्हणजे त्यांच्या कुटुंबासाठी पुन्हा उभे राहण्याची संधीच ठरली आहे.
एसीबी ठरली सामान्य माणसाच्या मदतीला!
या प्रकरणात अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेत्यांनी सुरुवातीपासूनच ट्रॅक्टर सोडण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र प्रश्न मार्गी लागत नव्हता. अखेर एसीबीच्या कारवाईने संपूर्ण प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले.
विशेष म्हणजे, कारवाईपुरतीच भूमिका न ठेवता संबंधित कुटुंबाला दिलासा मिळावा यासाठी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे “एसीबी म्हणजे केवळ कारवाई करणारी यंत्रणा नव्हे, तर अन्यायाविरुद्ध सामान्य नागरिकाच्या बाजूने उभी राहणारी यंत्रणा” अशी भावना या प्रकरणातून निर्माण झाली आहे.
सलाम एसीबीच्या पथकाला!
या संपूर्ण प्रकरणाचा शेवट एका गरीब शेतकरी कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधान आणणारा ठरला. ट्रॅक्टर पुन्हा त्यांच्या ताब्यात आला आणि शेतीचा गाडा पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.
भारत बोढेकर यांच्या कुटुंबासाठी हा केवळ ट्रॅक्टर परत मिळण्याचा क्षण नाही, तर संकटाच्या काळात कुणीतरी आपल्या पाठीशी उभे राहिले, याचा दिलासा आहे.
या प्रकरणात धाडसी कारवाई करून भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेणाऱ्या एसीबीच्या पथकाचे निश्चितच कौतुक करावे लागेल.
“एसीबीची कारवाई… सामान्य माणसाला दिलासा;
ट्रॅक्टर पुन्हा शेतकऱ्याच्या दारी!”
याच सकारात्मक संदेशाने या मालिकेला पूर्णविराम.


