“एसीबीच्या कारवाईनंतरही ट्रॅक्टर वन विभागाच्या ताब्यातच; आश्वासनांची मालिका, सुटका मात्र अद्याप अधांतरी!”
भद्रावती, न्यूज डेस्क, शंकर बोरघरे, 95 52 61 25 55
एसीबीच्या कारवाईनंतर वन विभागात खळबळ उडाली असली, तरी जप्त ट्रॅक्टरच्या सुटकेचा प्रश्न अद्यापही प्रलंबितच आहे. ट्रॅक्टर मालक भारत बोढेकर यांनी आज पुन्हा भद्रावती वनपरिक्षेत्र कार्यालय गाठून वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांची भेट घेतली.
यावेळी धानकुटे यांनी “एसीबीच्या कारवाईत अडकलेला संबंधित कर्मचारी आज कार्यालयात येणार असून, त्यानंतर आवश्यक दस्तऐवज पूर्ण करून मी स्वतः या प्रकरणात लक्ष घालणार,” असे सांगितले. मात्र यापूर्वीही अनेकदा प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले असून, प्रत्यक्षात ट्रॅक्टर अद्याप वन विभागाच्या ताब्यातच असल्याने वाहनमालकाचा संयम सुटू लागला आहे.
प्रश्न असा उपस्थित होत आहे की, एका कर्मचाऱ्यावरील एसीबी कारवाईमुळे संपूर्ण प्रशासकीय प्रक्रिया ठप्प राहणार का? शासनाच्या नियमांनुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून वाहनमालकाला न्याय देण्याऐवजी केवळ आश्वासनांवर वेळ का घालवला जात आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.
दररोज कार्यालयाच्या फेऱ्या, वाढता आर्थिक फटका आणि मानसिक त्रास यामुळे ट्रॅक्टर मालकाची अवस्था बिकट झाली आहे. आता वन विभागाच्या पुढील कृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रोखठोक सवाल…
-
दस्तऐवज पूर्ण होण्यासाठी नेमका किती वेळ लागणार?
-
एसीबी कारवाईचे कारण देऊन वाहन किती दिवस अडवून ठेवले जाणार?
-
ट्रॅक्टर मालकाला न्याय कधी मिळणार?की पुन्हा एकदा फक्त आश्वासनांचा पाऊस पडणार?


