समाज भवनासाठी झाडांची कत्तल; आता झाडांनाही ‘घर खाली करा’ची नोटीस?
गौतम नगरातील हिरवाईवर नगरपालिकेची नजर; नागरिकांचा सवाल समाज भवन उभे राहणार, पण सावली कुठे मिळणार?
भद्रावती, न्यूज डेस्क, शंकर बोरघरे, 95 52 61 25 55
गौतम नगरातील ओपन स्पेसमध्ये समाज भवन उभारण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा होताच परिसरातील झाडांनी जणू “आता आमचीही हकालपट्टी होणार की काय?” अशी भीती व्यक्त करण्याची वेळ आली आहे. अनेक वर्षांपासून परिसरात उभी असलेली जुनी झाडे विकासकामाच्या नावाखाली तोडण्याची तयारी असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
समाज भवनाची गरज आहे, याबाबत नागरिकांचे दुमत नाही. पण समाज भवनासाठी जागा हवी म्हणून आधी झाडेच जागेवरून गायब करायची, हा कोणता विकासाचा फॉर्म्युला? असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.
या झाडांनी अनेक वर्षे उन्हात सावली दिली, नागरिकांना शुद्ध हवा दिली, मुलांना खेळण्यासाठी जागा दिली आणि ज्येष्ठ नागरिकांना निवांत बसण्याची सोय केली. आता त्यांच्यावरच कुऱ्हाड चालणार असेल तर झाडांनी कदाचित प्रशासनाला एकच प्रश्न विचारावा
“साहेब, आम्ही एवढी वर्षे सेवा केली; आता आमचा अपराध काय?”
विकासाची व्याख्या बदलली की काय?
आजकाल विकासकाम म्हणजे रस्ता, इमारत आणि काँक्रीट असा काहीसा नवीन अर्थ निघत असल्याचे चित्र दिसत आहे. झाडे असतील तर अडथळा आणि झाडे नसतील तर विकास! अशी परिस्थिती निर्माण झाली तर उद्या नागरिकांनी सावलीसाठीही नगरपालिकेकडे परवानगी मागायची का, असा मिश्कील सवाल परिसरातून उपस्थित होत आहे.
समाज भवन उभारायचे असेल तर आराखड्यात थोडा बदल करून झाडे वाचवता येतील का, याचा विचार करणे एवढेही अवघड काम नसावे. कारण इमारत पुन्हा बांधता येते; पण २५-३० वर्षांचे झाड तयार करण्यासाठी २५-३० वर्षे लागतात.
नागमंदिर रोडचा अनुभव, आता गौतम नगरची पाळी?
दरम्यान, यापूर्वी नागमंदिर ते विंजासन रोडवरील २५ ते ३० वर्षे जुनी कडुलिंब व करंजीची झाडे तोडण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. त्यावेळीही झाडे तोडण्याच्या परवानगी आणि वृक्षसंवर्धन समितीच्या प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते.
आता गौतम नगरातील झाडांवरही संकट आले असल्याने नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे.
“झाडे तोडण्याची मालिका सुरू आहे की नगरपालिकेचा ‘ग्रीन क्लिअरन्स’ कार्यक्रम?”
एकीकडे वृक्षलागवड करा, पर्यावरण वाचवा, अशी आवाहने केली जातात आणि दुसरीकडे जुनी झाडे तोडण्याची वेळ येते. त्यामुळे वृक्षसंवर्धनाच्या फलकावर झाडे हिरवी ठेवायची आणि प्रत्यक्ष जागेवर मात्र ठिकाण मोकळे करायचे, असा प्रकार तर नाही ना, असा खोचक सवाल पर्यावरणप्रेमी करत आहेत.
झाडे वाचणार की फक्त फाईलमध्ये राहणार?
गौतम नगरातील नागरिकांची मागणी स्पष्ट आहे समाज भवन उभारण्यास विरोध नाही; मात्र झाडे तोडून समाज भवन नको. उपलब्ध जागेचा आराखडा बदलावा, पर्यायी जागेचा विचार करावा आणि शक्य तितकी झाडे वाचवावीत.
आता प्रश्न एवढाच आहे की, प्रशासन नागरिकांचा आवाज ऐकणार की “झाडे गेली तरी चालतील, पण बांधकाम थांबता कामा नये” या भूमिकेत राहणार?
कारण उद्या समाज भवनाच्या उद्घाटनाला मोठमोठे मान्यवर येतील, फित कापली जाईल, टाळ्यांचा कडकडाट होईल… पण उद्घाटनाला सावली देण्यासाठी एखादे झाड उरले असेल का?
आता झाडांची ‘कसोटी’ आणि प्रशासनाचीही!
गौतम नगरातील झाडे वाचविण्यासाठी नागरिकांनी आवाज उठविला आहे. समाज भवनाची गरज मान्य असतानाही झाडे तोडून विकास करण्याऐवजी झाडे वाचवून विकास करता येतो का, याचा विचार करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
आज समाज भवनासाठी झाडे अडथळा वाटत असतील, तर उद्या सावली, हवा आणि पर्यावरणासाठी नागरिकांनी नेमके कुठे जावे, हा प्रश्न आहे. झाडे कागदावर लावता येतात; मात्र २५-३० वर्षांची सावली कागदावर तयार करता येत नाही.
आता प्रशासनाने नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन प्रस्तावित आराखडा, झाडांची संख्या, संबंधित परवानग्या आणि वृक्षसंवर्धन समितीची प्रक्रिया याबाबत स्पष्टता द्यावी, अशी मागणी होत आहे.
समाज भवन उभे राहो; पण त्याच्या पायाभरणीत जुन्या झाडांची कत्तल नको, एवढीच नागरिकांची साधी अपेक्षा आहे.
पुढील भागात…
समाज भवनाच्या आराखड्यात झाडांसाठी जागा आहे का? झाडे तोडण्याचा निर्णय नेमका कुणाचा? वृक्षसंवर्धन समितीची भूमिका काय? आणि नागरिकांच्या विरोधानंतर नगरपालिका प्रशासन काय निर्णय घेणार?
या प्रश्नांचा सविस्तर वेध पुढील भागात…


