Friday, September 4, 2026
Homeचंद्रपूरकोर्धा...कोसंबी रस्ता झाला ‘थरारक सफर’; समोर वाहन आले की धडधड वाढते!

कोर्धा…कोसंबी रस्ता झाला ‘थरारक सफर’; समोर वाहन आले की धडधड वाढते!

कोर्धा..कोसंबी गवळी रस्ता : सिमेंटचा झाला, पण साइडिंगला ‘रामभरोसे’चा आधार!

मोठे वाहन आले की दुचाकीस्वारांचा जीव टांगणीला; रस्ता तयार, सायडिंग गायब आणि अपघातांना मात्र ‘फ्री एन्ट्री’!

नागभीड, न्यूज डेस्क …यशवंत निकुरे

कोर्धा ते कोसंबी गवळी जाणारा सिमेंट रस्ता सध्या नागरिकांसाठी रस्ता कमी आणि ‘जिवंतपणी थरारपट’ जास्त ठरत आहे. सन २०२४-२५ मध्ये रस्ता सिमेंटचा झाला; मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला सायडिंगला मुरूम भरण्याचे काम बहुधा ‘नंतर करू’ म्हणत नंतरचा पत्ता विसरल्याचे चित्र दिसत आहे.

समोरून एखादे मोठे चारचाकी वाहन आले की दुचाकीस्वारांची अवस्था अशी होते की, ‘रस्ता सोडायचा कुठे आणि जीव वाचवायचा कुठे?’ हा प्रश्न पडतो. रस्त्याच्या कडेला मुरूमाऐवजी मातीचा भराव असल्याने बाजूला घेतलेली दुचाकी कधी रस्त्यावर राहते तर कधी थेट नशिबाच्या भरवशावर!

चार-पाच गावांना जोडणारा आणि तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी महत्त्वाचा असलेला हा मार्ग असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्यात परिसरात वाघांचा वावर असल्याने रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांसमोर रस्ता, खड्डा आणि वाघ—तिघांपैकी कोण आधी भेटेल, याची शाश्वती नाही!

अधिकाऱ्यांची पाहणी झाली की फक्त रस्त्यावरून गाडी गेली?

रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी केली की नाही, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. पाहणी झाली असेल तर सायडिंगची अवस्था दिसली नाही का? आणि दिसली असेल तर ‘सगळं मस्त आहे’ असा रिपोर्ट नेमका कोणत्या रस्त्यावर तयार झाला? असा खोचक सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

रस्त्यावरून अनेक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी ये-जा करतात. मात्र रस्त्याची अवस्था पाहूनही सगळे शांत असल्याने नागरिकांमध्ये एकच चर्चा “रस्ता आमचा, त्रास आमचा; मग आवाजही आम्हीच करायचा का?”

अपघातांना ‘स्वागत कक्ष’ कशासाठी?

या रस्त्यावर यापूर्वी अनेक अपघात झाल्याचे आणि अनेकांना दुखापत झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तरीही प्रशासनाने तातडीने दुरुस्ती केली नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नागरिकांची मागणी साधी आहे—रस्ता सिमेंटचा केला असेल तर सायडिंगही माणसांसाठी करा; वाघांसाठी जंगल आणि वाहनांसाठी रस्ता एवढी तरी व्यवस्था ठेवा!

संबंधित अधिकाऱ्यांनी आता कागदावरची पाहणी न करता प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन रस्ता तपासावा आणि सायडिंगचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

शेवटी एवढेच या रस्त्यावर अपघात होऊ नयेत म्हणून प्रशासनाने आधीच जागे व्हावे; कारण ‘अपघात झाल्यावर दुरुस्ती’ हा प्रयोग जनतेला पुन्हा नको आहे!

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!