नागभीड तालुक्यात चोऱ्यांचे सत्र; मौशी येथे लाखो रुपयांचे दागिने लंपास
कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधून घरफोडी; कुलूप तोडून सोन्यावर डल्ला
नागभीड , न्यूज डेस्क
✍️यशवंत निकुरे
नागभीड तालुक्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण असतानाच चोरीच्या घटनांनी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मौशी येथे कुटुंबीय बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे.
मौशी येथील एक कुटूंब आपल्या कुटुंबीयांसह मोठ्या मुलीला भेटण्यासाठी ब्रह्मपुरी येथे गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी लहान मुलगी विजयासोबत त्या घरी परतल्या असता मुख्य दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यानंतर सामान व कपड्यांची अस्ताव्यस्त फेकाफेक झाल्याचे निदर्शनास आले.
बेडरूममधील कपाट तपासले असता सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात आले. तक्रारीनुसार, यामध्ये दोन गोफ, कानातील दोन जोड, सुमारे तीन ग्रॅमची नथ आणि अर्ध्या तोळ्याची अंगठी यांचा समावेश आहे. चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, घरातील चांदीचे दागिने मात्र चोरट्यांनी तिथेच सोडल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे चोरट्यांचे लक्ष्य नेमके सोन्याचे दागिनेच होते का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
घटनेनंतर बनकर कुटुंबीयांनी नागभीड पोलीस ठाणे गाठून चोरीची तक्रार दाखल केली. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. मात्र, चोरट्यांचा माग कधी लागणार आणि चोरीचा तपास कुठपर्यंत पोहोचला, याकडे आता मौशीसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात घराबाहेर जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असते. अशा परिस्थितीत पोलिसांनी गस्त अधिक प्रभावी करून चोरीच्या घटनांना आळा घालण्याची गरज आहे. चोरीचे सत्र थांबणार कधी? हा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.


