Tuesday, April 21, 2026
Homeभद्रावतीफैसला जवळ...! नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीस प्रशासन सज्ज..!

फैसला जवळ…! नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीस प्रशासन सज्ज..!

भद्रावती ( प्रतिनीधी):-
भद्रावती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक, २०२५ अंतर्गत थेट नगराध्यक्ष व २९ नगरसेवक पदाच्या मतमोजणीसाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. यासंदर्भात एक प्रसिद्ध पत्रक जाहीर केले त्यात, मतमोजणी प्रक्रिया दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), भद्रावती येथे होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच मा. उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करून ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असल्याचेही त्या प्रसिद्ध पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
भद्रावती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत दि. ०२ डिसेंबर २०२५ रोजी शहरातील एकूण ६३ मतदान केंद्रांवर थेट नगराध्यक्ष पदासाठी १ व नगरसेवक पदासाठी २९ जागांसाठी मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पडली होती.
तसेच मतमोजणीसाठी एकूण १४ टेबल्सची व्यवस्था करण्यात आली असून, प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र टेबल ठेवण्यात आले आहे. एका टेबलवर एका प्रभागाची मतमोजणी पूर्ण केली जाणार आहे.
प्रभाग क्रमांक ०३, ०२, १०, ०६, ०८, ०९, १३, ०१, ०५, ०७, ११, १२, ०४ व १४ या प्रभागांतील सदस्यांची मतमोजणी विविध फेऱ्यांमध्ये होणार असून, या सर्व फेऱ्यांमधूनच अध्यक्ष पदाच्या मतमोजणीची कार्यवाहीही पूर्ण करण्यात येणार आहे.
पोस्टल बॅलेटसाठी स्वतंत्र टेबल ठेवण्यात आले आहे.
प्रसंगी मतमोजणी प्रक्रियेसाठी उमेदवारांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींना अध्यक्ष पदासाठी प्रत्येकी १४ व सदस्य पदासाठी प्रत्येकी १ प्रतिनिधीस मतमोजणी कक्षात प्रवेश देण्यात येणार आहे. प्रतिनिधी नियुक्तीसाठी नमुना ९(२) नुसार अर्ज सादर करून नगरपरिषद कार्यालयामार्फत ओळखपत्र वितरित करण्यात आली आहेत.
दि. १८ डिसेंबर २०२५ पर्यंत उमेदवार १४७ व उमेदवारांचे प्रतिनिधी १२७, असे एकूण ३४४ ओळखपत्रे वितरित करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.
याशिवाय मतमोजणीच्या दिवशी आयटीआय, भद्रावती परिसरातील मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच उमेदवार, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधींसाठी आयटीआय मैदानात स्वतंत्र वाहनतळ (पार्किंग) व्यवस्था करण्यात आली आहे.
मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व नागरिकांनी शांतता व शिस्त राखावी व सुरक्षा यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाने केले आहे.
ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अतुल जटाळे, निवडणूक सहाय्यक निर्णय अधिकारी डॉ. विशाखा शेळकी, अति. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गिरीश बोरडे तसेच योगेश पारधी, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन भद्रावती यांनी दिली आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!