Saturday, April 18, 2026
Homeभद्रावतीदारू भट्टी चालकाची दहशत; बकरीच्या मटण विक्रेत्यास मारहाण..!

दारू भट्टी चालकाची दहशत; बकरीच्या मटण विक्रेत्यास मारहाण..!

“व्हिडिओ शूट केलास?” या संशयातून वाद

भद्रावती (जि. चंद्रपूर), दि. २४

भद्रावती शहरात देशी दारू भट्टी चालकाकडून बकरीच्या मटण विक्रेत्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली असली, तरी या प्रकरणात भद्रावती पोलिसांनी तात्काळ दखल घेत पीडिताला दिलासा देण्याची भूमिका घेतल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

तक्रारदार प्रविण मंगल कटारे (वय ३५, व्यवसाय मजुरी व बकरीचे मटण विक्री, रा. गौराळा, चंद्रपूर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या दुकानालगत नरेश अण्णा यांची देशी दारू भट्टी असून ती परिसरात वादग्रस्त ठरली आहे. या भट्टीच्या आसपास यापूर्वीही तणावपूर्ण घटना घडल्याचे स्थानिकांनी सांगितले.

दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ६ वाजता प्रविण कटारे हे आपल्या भाच्यासह चंद्रपूर नागपूर मार्गावरील डिव्हायडरजवळ बसले असताना, दारू भट्टी चालकाने त्यांच्यावर संशय व्यक्त करत वाद घातला.
“तू माझ्या दुकानाचा व्हिडिओ शूट का करतोस?” या कारणावरून सुरू झालेल्या वादात आरोपीने शिवीगाळ करत हाताने व बुक्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.

याशिवाय भांडण वाढत असताना प्रविण कटारे यांचा मित्र सुनील तुम्मे मध्यस्थीला पुढे आला; मात्र त्यालाही ढकलण्यात आले. घटनेत गंभीर जखमा झाल्या नसल्या, तरी परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.

दरम्यान घटनेनंतर भद्रावती पोलिसांनी तक्रारदाराची लेखी तक्रार तत्काळ स्वीकारून प्रकरणाची नोंद केली. पोलिसांनी दोन्ही बाजूंची चौकशी सुरू करत, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. तक्रारदाराने व्यक्त केलेल्या भीतीची दखल घेत पोलिसांनी आवश्यक संरक्षणाची हमी दिल्याचेही समोर आले आहे.

“कोणत्याही नागरिकावर अन्याय होऊ देणार नाही. कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट संदेश पोलिसांकडून देण्यात आला असून, त्यामुळे स्थानिक व्यापारी व रहिवाशांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेमुळे भद्रावतीतील व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला असला, तरी पोलिसांच्या तत्पर भूमिकेमुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली. दारू भट्ट्यांमुळे उद्भवणाऱ्या सामाजिक समस्यांवर प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

प्रकरणाचा तपास सुरू असून, पुढील कायदेशीर कारवाई पोलिसांकडून केली जाणार आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!