Friday, September 4, 2026
Homeभद्रावती“मच्छर बारीक मुंगीसारखे, चावा मात्र दमदार!” इम्रान खान आक्रमक; फॉगिंग मशीन नागपुरात

“मच्छर बारीक मुंगीसारखे, चावा मात्र दमदार!” इम्रान खान आक्रमक; फॉगिंग मशीन नागपुरात

मच्छरांच्या उपद्रवावर इम्रान खान आक्रमक; “फॉगिंग मशीन नागपुरात, मग भद्रावतीकरांचे काय?”

बारीक मुंगीसारखे मच्छर, पण चावा मात्र दमदार; काही प्रभागातील नागरिकांनी इम्रान खान यांच्याकडे मांडली व्यथा

भद्रावती, न्यूज डेस्क

शंकर बोरघरे

95 52 61 25 55

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भद्रावती शहरात सध्या मच्छरांचा उपद्रव वाढल्याने नागरिक त्रस्त असल्याचे चित्र काही प्रभागांत दिसून येत आहे. बारीक मुंगीसारखे दिसणारे हे मच्छर चावूनही पळून जात नाहीत, अशी उपरोधिक प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत असून, नगर परिषदेकडून नियमित फॉगिंग करण्याची मागणी जोर धरत आहे.

शहरातील काही प्रभागांमध्ये सायंकाळ होताच मच्छरांचा ‘दरबार’ भरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. घराबाहेर पडले की मच्छर, घरात गेले की मच्छर आणि रात्री झोपायला गेले तरी मच्छर …अशी परिस्थिती निर्माण झाल्याची नागरिकांची तक्रार आहे.

नागरिकांचा इम्रान खान यांना फोन…

मच्छरांच्या वाढत्या त्रासामुळे शहरातील काही प्रभागांतील नागरिकांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव इम्रान खान यांना फोन करून आपल्या परिसरातील समस्या सांगितल्याचे समोर आले आहे.

नागरिकांनी परिसरात फॉगिंग होत नसल्याची माहिती दिल्यानंतर इम्रान खान यांनी या तक्रारीची दखल घेत नगर परिषद भद्रावतीच्या संबंधित कर्मचाऱ्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.

यावेळी त्यांनी शहरातील फॉगिंगची व्यवस्था, फॉगिंग मशीनची उपलब्धता आणि नागरिकांना मच्छरांच्या त्रासापासून दिलासा देण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत आक्रमकपणे जाब विचारला.

“मशीन कुठे आहे?”  उत्तर : “नागपूरला गेली आहे!”

फॉगिंग मशीन उपलब्ध नसल्याबाबत विचारणा केली असता, नगर परिषदेकडील संबंधित कर्मचाऱ्याने “फॉगिंग मशीन नागपूरला गेली आहे” असे सांगितल्याचे इम्रान खान यांनी सांगितले.

हे उत्तर ऐकल्यानंतर नागरिकांमध्ये मात्र चांगलीच उपरोधिक चर्चा रंगली आहे.

“फॉगिंग मशीन नागपुरात गेली आणि मच्छर भद्रावतीतच थांबले; आता मच्छरांना नागपूरला पाठवायचे की मशीन भद्रावतीला आणायची?” असा सवाल नागरिकांकडून विनोदाने केला जात आहे.

मच्छर बारीक मुंगीसारखे असले तरी त्यांचा त्रास मोठा असल्याने प्रशासनाने या समस्येकडे केवळ विनोद म्हणून न पाहता तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

मशीन बाहेरगावी, नागरिकांचा त्रास मात्र शहरात!

फॉगिंग मशीन दुरुस्ती अथवा अन्य कारणासाठी नागपूर येथे पाठविण्यात आली असल्यास, मशीन परत येईपर्यंत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पर्यायी फॉगिंग मशीनची व्यवस्था का करण्यात आली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहरातील नाले, साचलेले पाणी, कचरा तसेच डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांची नियमित पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. केवळ फॉगिंग मशीनवर अवलंबून न राहता स्वच्छता व डास नियंत्रणाची संपूर्ण यंत्रणा सक्रिय करण्याची गरज आहे.

इम्रान खान यांचा नगर परिषदेला सवाल….

नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर इम्रान खान यांनी नगर परिषद प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे, अशी भूमिका घेतली आहे.

“नागरिकांना मच्छरांचा त्रास होत असेल तर कारणे सांगण्यापेक्षा उपाययोजना होणे महत्त्वाचे आहे. फॉगिंग मशीन उपलब्ध नसेल तर पर्यायी व्यवस्था करून नागरिकांना दिलासा द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.

भद्रावती ऐतिहासिक; पण मच्छरांचा इतिहास नको!

भद्रावती शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मात्र शहराची ओळख इतिहासासोबतच स्वच्छता आणि चांगल्या नागरी सुविधांसाठीही व्हावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

मच्छर बारीक मुंगीसारखे असतील, चावा कितीही छोटा असेल; पण नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने फॉगिंग मशीन नेमके कधी परत येणार, तोपर्यंत कोणती पर्यायी व्यवस्था केली जाणार आणि संबंधित प्रभागांमध्ये फॉगिंगचे वेळापत्रक काय असेल, याबाबत स्पष्टता देणे आवश्यक आहे.

आता भद्रावतीकरांचा प्रशासनाला एकच उपरोधिक सवाल

“फॉगिंग मशीन नागपुरात आणि मच्छर भद्रावतीत; मग नागरिकांनी रात्री झोपताना ‘मच्छरांशी करार’ करायचा का?”

नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन इम्रान खान यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नावर नगर परिषद प्रशासन आता काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!