Friday, September 11, 2026
Homeचंद्रपूरनिवडणुकीत ‘आपला माणूस’… निकालानंतर ‘व्हीआयपी’!

निवडणुकीत ‘आपला माणूस’… निकालानंतर ‘व्हीआयपी’!

मत मागताना दारात… जिंकल्यावर दाराबाहेर!

निवडणुकीपूर्वीचा “आपला माणूस” आणि निकालानंतरचा “साहेब”  व्यंगात्मक कथा

निवडणुकीचे दिवस होते…

गल्लीत सकाळपासून एकच लगबग सुरू होती. हातात पत्रके, मागे चार-पाच कार्यकर्ते आणि चेहऱ्यावर जग जिंकल्याचा आत्मविश्वास घेऊन एक उमेदवार प्रत्येक घराचा दरवाजा ठोठावत होता.

“काका, मत तुमचं… माणूस तुमचा!”

एका घरात आजी बसली होती.

उमेदवार लगेच खाली बसला.

“आजी, तब्येत कशी आहे? औषधं वेळेवर घेता ना?”

आजीला आश्चर्य वाटलं…

कारण मागील पाच वर्षांत हा माणूस तिच्या गल्लीत फिरकलाही नव्हता!

पुढच्या घरात एक तरुण भेटला.

“भाऊ, तुझ्या नोकरीचं बघू… फक्त मला एक संधी दे!”

दुसऱ्या घरात पाणीप्रश्न.

“पहिल्याच बैठकीत सोडवतो!”

तिसऱ्या घरात रस्त्याचा प्रश्न.

“हा माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न समजा!”

चौथ्या घरात गटाराची समस्या.

“मी जिंकलो नाही तरी तुमच्या सोबत आहे!”

लोक भारावले.

कारण उमेदवार आता उमेदवार नव्हता…

तो प्रत्येकाच्या घरचा मुलगा, भाऊ, मित्र आणि सेवक झाला होता!


निकाल लागला.

उमेदवार जिंकला.

फटाके फुटले.

हार पडले.

बॅनर लागले.

आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे..

“भाऊ” एका दिवसात “साहेब” झाला!


काही दिवसांनी तोच तरुण नोकरीच्या कामासाठी साहेबांच्या कार्यालयात गेला.

बाहेर बसलेल्या व्यक्तीने विचारलं

“कोण?”

तो म्हणाला

“मी त्यांच्या प्रभागातला… निवडणुकीत रोज सोबत होतो.”

उत्तर आलं

“साहेब मिटिंगमध्ये आहेत.”

तो दोन तास बसला.

पुन्हा विचारलं

“साहेबांना भेटता येईल का?”

उत्तर बदललं नाही.

“आज शक्य नाही. अपॉइंटमेंट घेऊन या.”

तरुण शांत झाला.

कारण निवडणुकीत हा साहेब त्याच्या घराच्या दारात उभा राहून म्हणाला होता.

“भाऊ, तुझं काम म्हणजे माझं काम!”


दुसऱ्या दिवशी तीच आजी साहेबांकडे गेली.

तिला रस्त्याची समस्या सांगायची होती.

दारात उभ्या व्यक्तीने विचारलं.

“कोणाला भेटायचं?”

आजी म्हणाली.

“आपल्या त्या… निवडणुकीत रोज माझ्या घरी येणाऱ्या मुलाला.”

दारातल्या व्यक्तीने हसत उत्तर दिलं..

“आजी, आता ते ‘साहेब’ आहेत!”

आजीने क्षणभर विचार केला आणि म्हणाली.

“असं का? मग निवडणुकीच्या वेळी ‘मुलगा’ होता… आणि जिंकल्यावर साहेब कसा झाला?”

बाहेर उभे असलेले लोक हसू दाबू लागले.


काही दिवसांनी साहेबांचा वाढदिवस आला.

शहरभर बॅनर!

“जनतेचे लाडके, विकासपुरुष, सर्वसामान्यांचे कैवारी, जनसेवेसाठी सदैव तत्पर…”

तोच तरुण बॅनरकडे पाहत होता.

त्याच्या हातात साहेबांना द्यायचा अर्ज होता.

तो अर्ज अजूनही त्याच्याकडेच होता.


गल्लीत एक वृद्ध बसला होता.

त्याने तरुणाला विचारलं

“काय रे, काम झालं का?”

तरुण हसला आणि म्हणाला

“काका, निवडणुकीत साहेब माझ्या दारात होते… आता मी साहेबांच्या दाराबाहेर आहे!”

वृद्धाने मिश्कील हसत उत्तर दिलं

“मग निवडणूक खरी जिंकली कोणी?”

तरुण म्हणाला

“साहेबांनी मतं जिंकली… आणि आम्ही आश्वासनांवर विश्वास ठेवून हरलो!”

क्षणभर शांतता पसरली.


रोखठोक…

निवडणुकीपूर्वी मतदार म्हणजे कुटुंब…
निकालानंतर मतदार म्हणजे ‘व्हिजिटर’!

मत मागताना.“मी तुमचा माणूस आहे!”
मत मिळाल्यावर.. “साहेब व्यस्त आहेत!”

मत मागताना दारात… जिंकल्यावर दाराबाहेर!


✍️ शेवटचा शब्द…

वरील व्यंगात्मक लेखातील पात्रे, प्रसंग आणि संवाद हे पूर्णतः काल्पनिक आहेत. या लेखाचा कोणत्याही व्यक्ती, संस्था, पदाधिकारी किंवा घडलेल्या घटनेशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध नाही. कोणाला स्वतःशी साधर्म्य वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

हे व्यंग कोणावर आरोप करण्यासाठी नाही; मात्र समाजात दिसणाऱ्या प्रवृत्तीवर आरसा दाखवण्यासाठी नक्कीच आहे. आरशात चेहरा दिसला म्हणून आरशाला दोष देता येत नाही!

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!