नागमंदिर कांप्लेक्स चा पुढे; ४० वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने हत्या
उमदेव मेश्राम यांचा मृत्यू; भद्रावती पोलिसांकडून तपास सुरू
भद्रावती, न्यूज डेस्क
नागमंदिर चौक परिसरात बुधवारी सकाळी ४० वर्षीय उमदेव भावराव मेश्राम यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, भद्रावती पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, उमदेव मेश्राम हे शिवाजीनगर परिसरात वास्तव्यास होते. ते मूळचे भद्रावती तालुक्यातील देवुळवाडा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. यापूर्वी ते लिफ्ट मशीन व सिमेंट ढलाईच्या कामाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळावरील पुरावे, मृतकाच्या हालचाली तसेच घटनेपूर्वी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींबाबत माहिती संकलित केली जात आहे.
हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतकाचे पूर्वीचे कामाचे संबंध, संभाव्य वाद अथवा अन्य कोणत्या कारणाचा या घटनेशी संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या कोणत्याही शक्यतेला सध्या अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके कार्यरत असून, हत्येचा उलगडा करण्यासाठी तपासाची विविध दिशांनी कार्यवाही सुरू आहे.


