गणरायाला शांततेत व शिस्तीत निरोप द्या!
गणेश मंडळे व नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
भद्रावती , न्यूज डेस्क
शंकर बोरघरे…95 52 61 25 55
आज भद्रावती शहरात गणरायाच्या विसर्जनाचा सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार आहे. विसर्जन मिरवणुका शांततेत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडाव्यात, यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक बंदोबस्त व नियोजन करण्यात आले आहे.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मिरवणुकीदरम्यान प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. ध्वनिक्षेपकाचा वापर निर्धारित नियमांनुसार करावा. वाद-विवाद, धक्काबुक्की अथवा अनुचित प्रकार टाळावेत. तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी.
महिला, बालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी. कोणत्याही प्रकारच्या अफवा अथवा चुकीची माहिती प्रसारित करू नये. संशयास्पद हालचाल किंवा अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी स्वतःहून कायदा हातात न घेता तातडीने पोलिसांना माहिती द्यावी.
आपत्कालीन परिस्थितीत डायल ११२
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी डायल ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा.
गणरायाच्या विसर्जनाचा सोहळा आनंदात, भक्तिभावाने आणि शांततेत पार पडण्यासाठी सर्व गणेश मंडळे, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी भद्रावती पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
उत्सवाचा उत्साह कायम ठेवूया,
शिस्तीची साथ देऊया आणि गणरायाला आनंदात निरोप देऊया!


