घरात तीन तलवारी अन् खंजर; भद्रावती पोलिसांची धडक कारवाई
गोपनीय माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाची झडती; १३ हजारांचा शस्त्रसाठा जप्त
भद्रावती, न्यूज डेस्क, शंकर बोरघरे 95 52 61 25 55
घरात संसारोपयोगी वस्तू असतात; मात्र खापरी वॉर्ड क्रमांक ३ येथील एका घरात चक्क तीन तलवारी आणि एक खंजर आढळून आल्याने परिसरात चर्चा रंगली. गोपनीय माहिती मिळताच भद्रावती पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने संबंधित घराची झडती घेत हा शस्त्रसाठा जप्त केला.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हे शोध पथकाला माहिती मिळाली की, गोविंदा मारोती बावणे (वय २६ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. खापरी वॉर्ड क्र. ३, भद्रावती) हा आपल्या घरी तलवारीसारखी घातक शस्त्रे बेकायदेशीररीत्या बाळगून आहे. माहिती मिळताच पोलिस पथकाने पंचांच्या मदतीने संबंधित ठिकाणी जाऊन घराची झडती घेतली.
झडतीदरम्यान घरातून तीन तलवारी आणि एक खंजर मिळून आले. त्यामुळे घरात नेमका कसला ‘संग्रह’ ठेवण्यात आला होता, याची चर्चा सुरू झाली. पोलिसांनी सर्व शस्त्रे ताब्यात घेतली असून जप्त मुद्देमालाची एकूण अंदाजे किंमत १३ हजार रुपये आहे.
जप्त करण्यात आलेल्या एका तलवारीची पूर्ण लांबी ६२ सेंमी असून तिचे पाते ४८ सेंमी आहे. तिची अंदाजे किंमत ५ हजार रुपये आहे. दुसऱ्या तलवारीची पूर्ण लांबी ५२ सेंमी असून तिची अंदाजे किंमत ४ हजार रुपये, तर तिसऱ्या तलवारीची पूर्ण लांबी ५६ सेंमी असून तिची अंदाजे किंमत ३ हजार रुपये आहे. तसेच ३४ सेंमी पूर्ण लांबीचा जुना वापरातील खंजर अंदाजे १ हजार रुपये किमतीचा आहे.
या प्रसंगी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ०४६/२०२६, कलम ४ व २५ आर्म्स अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल तसेच प्रभारी अधिकारी सचिन खेत्रे साहेब (परि. पोलीस उपअधीक्षक), पोलीस ठाणे भद्रावती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गोपनीय माहिती मिळताच तिची खातरजमा करून थेट संबंधित ठिकाणी पोहोचणे आणि घरातून शस्त्रे जप्त करणे, यामुळे पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाची तत्परता पुन्हा एकदा दिसून आली. पोलिसांच्या नजरेतून शस्त्रसाठा सुटत नसल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले.
या कारवाईत पोउपनि. संतोष केदार, पोहवा. गोपाल आतकुलवार, देवानंद डुकरे, अनुप आष्टुनकर, प्रशांत शेंदरे, पोअं. योगेश घाटोळे, खुशाल कावळे, संतोष राठोड आणि मपोअं. मोनाली गारघाटे यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, जप्त करण्यात आलेली शस्त्रे कशासाठी आणि कोणत्या उद्देशाने ठेवण्यात आली होती, याचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.


