चंद्रपूर, भद्रावती न्यूज डेस्क ✍️
भद्रावती तालुक्यातील कोंढा गावातील बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या बेकायदा देशी-विदेशी दारू विक्री व सेवनाच्या प्रकारांवर अखेर कारवाई करण्यात आली. या कारवाईमागे प्रसारमाध्यमांनी सातत्याने मांडलेली रोखठोक बाब आणि त्यास मिळालेला “इम्रान खान”,”भाजयुमो प्रदेश सचिव व जनसेवक” यांचा पुढाकार कारणीभूत ठरला आहे.
दरम्यान, बसस्थानक परिसरात चहा-नाश्त्याच्या दुकानांच्या आडोशाला खुलेआम अवैध दारू विक्री सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने होत होत्या. बसस्थानक हा शालेय विद्यार्थी, प्रवासी व जड वाहनचालकांची मोठी वर्दळ असलेला सार्वजनिक व संवेदनशील भाग असल्याने या प्रकारांबाबत नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात होती.
प्रसंगी दारूचा वास, अनुचित वर्तन तसेच मद्यधुंद अवस्थेतील व्यक्तींमुळे विद्यार्थी व प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. विशेषतः सकाळ व सायंकाळच्या वेळेत शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या परिस्थितीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते.
या पार्श्वभूमीवर भाजयुमो प्रदेश सचिव तथा जनसेवक इम्रान खान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की,
“बसस्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी दारू विक्री व सेवन सुरू असणे समाजहिताच्या दृष्टीने चुकीचे आहे. येथे विद्यार्थी, महिला व प्रवासी मोठ्या संख्येने ये-जा करतात. अशा ठिकाणी शिस्त व सुरक्षितता राखली जाणे आवश्यक आहे.”
ते पुढे म्हणाले की,
“नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या गेल्या पाहिजेत. प्रसारमाध्यमांनी हा विषय सातत्याने समोर आणला, त्यामुळे सामान्य नागरिकांच्या भावना व्यक्त झाल्या. अशा प्रकारांना कायमस्वरूपी आळा बसला पाहिजे.”
या कारवाईनंतर कोंढा गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, बसस्थानक परिसर अधिक सुरक्षित राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. माध्यमांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि जनसेवकांचा सक्रिय सहभाग एकत्र आल्यास सार्वजनिक प्रश्न मार्गी लागू शकतात, असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


