Tuesday, July 28, 2026
Homeचंद्रपूरभररस्त्यातील मोकाट जनावरे अपघातांना निमंत्रण; जबाबदार मालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

भररस्त्यातील मोकाट जनावरे अपघातांना निमंत्रण; जबाबदार मालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

रस्त्यांवरील मोकाट जनावरांना आवरा; अन्यथा मालकांवर गुन्हे दाखल करा..!

पावसाळ्यात अपघातांचा वाढता धोका; प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी

चंद्रपूर, न्यूज डेस्क
प्रतिनिधी : शंकर बोरघरे
९५२५६१२५५५

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर मोकाट गाई, बैल व इतर जनावरांचा मुक्त संचार वाढल्याने अपघातांचा धोका गंभीर बनला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी भररस्त्यात बसलेली किंवा अचानक वाहनांसमोर येणारी जनावरे वाहनचालकांसाठी जीवघेणी ठरत आहेत. त्यातच पावसामुळे रस्त्यांवरील खड्डे पाण्याखाली गेल्याने अपघातांची शक्यता अधिक वाढली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव इम्रान खान यांनी प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मोकाट जनावरे रस्त्यावर सोडणाऱ्या निष्काळजी मालकांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असून, याकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रशासनाने विशेष मोहीम राबवून रस्त्यांवरील मोकाट जनावरे ताब्यात घ्यावीत, त्यांची योग्य व्यवस्था करावी आणि सार्वजनिक रस्त्यांवर जनावरे सोडणाऱ्या मालकांवर कठोर दंडात्मक कारवाई करून आवश्यकतेनुसार गुन्हे दाखल करावेत, अशी त्यांनी मागणी केली आहे.

यासोबतच पावसाळ्यात खड्डेमुक्त रस्त्यांसाठी युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे हाती घेऊन संभाव्य अपघात टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय तात्काळ राबवावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असून, याकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात गंभीर दुर्घटना घडू शकतात, असा इशाराही इम्रान खान यांनी दिला आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!