तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी भद्रावती नगरपरिषदेचा अनोखा पुढाकार!
पूजेचे साहित्य जमा करण्यासाठी विशेष कलश; कृत्रिम कुंडात गणपती-गौरी विसर्जन करणाऱ्यांसाठी सुंदर बक्षिसे..
भद्रावती , न्यूज डेस्क
गौरी व गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर तलावांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी भद्रावती नगरपरिषदेने पर्यावरणपूरक आणि अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. गवराळा व दुधाळा तलाव येथे पूजेचे साहित्य जमा करण्यासाठी विशेष कलश ठेवण्यात येणार असून, गवराळा तलावाजवळ उभारण्यात आलेल्या कृत्रिम कुंडात घरगुती गणपती व गौरीचे विसर्जन करणाऱ्या नागरिकांसाठी सुंदर बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत.
गणपती व गौरी विसर्जनानंतर हार, फुले, दुर्वा, पत्री व इतर पूजेचे साहित्य थेट तलावाच्या पाण्यात टाकल्यामुळे जलप्रदूषणाची समस्या निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन नगरपरिषद प्रशासनाने विसर्जन स्थळी मोठ्या आकाराचे पूजेचे साहित्य जमा करण्यासाठी विशेष कलश उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच, नागरिकांनी नैसर्गिक तलावात मूर्ती विसर्जन करण्याऐवजी गवराळा तलावाजवळ तयार करण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडाचा वापर करावा, यासाठी नगरपरिषदेने विशेष प्रोत्साहनपर योजना राबविली आहे. घरगुती गणपती व गौरीचे विसर्जन कृत्रिम कुंडात करणाऱ्या नागरिकांना सुंदर बक्षिसे देण्यात येणार असल्याने या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
हा पर्यावरणपूरक उपक्रम मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांच्या नेतृत्वात राबविण्यात येत आहे.
नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, फुले, हार व इतर पूजेचे साहित्य तलावात न टाकता विशेष कलशात जमा करावे आणि घरगुती गणपती व गौरीचे विसर्जन कृत्रिम कुंडात करून स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त भद्रावतीच्या उपक्रमात सहभागी व्हावे.


