Wednesday, November 4, 2026
Homeचंद्रपूरपत्रकार प्रिया खंडागळे यांच्यावरील कथित मारहाणीने पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह!

पत्रकार प्रिया खंडागळे यांच्यावरील कथित मारहाणीने पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह!

पत्रकार प्रिया खंडागळे यांच्यावरील कथित मारहाणीने पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह!

महिला पोलीस कर्मचाऱ्याची गडचिरोलीला बदली करा; पत्रकाराची जाहीर माफी मागावी डॉ. विश्वासराव आरोटे यांची मागणी; अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा!

नवी मुंबई :-

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर हल्ल्यांच्या घटना वाढत असताना आता पोलीस यंत्रणेतील कर्मचाऱ्यांकडूनच पत्रकाराला मारहाण झाल्याचा आरोप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. नवी मुंबई येथील महिला पत्रकार प्रिया खंडागळे यांच्याशी संबंधित कथित मारहाण प्रकरणाचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांनी तीव्र निषेध केला आहे. संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याची गडचिरोली येथे बदली करावी, पत्रकाराची जाहीर माफी मागावी आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, नवी मुंबई परिसरातील कथित अवैध कुंटणखाना व्यवसायासंदर्भात स्थानिक नागरिकांच्या मागणीवरून पत्रकार प्रिया खंडागळे यांनी वृत्त प्रसिद्ध केले होते. परिसरातील अवैध व्यवसाय बंद व्हावेत आणि नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात, हा या वृत्तामागील उद्देश होता. मात्र, या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून पत्रकाराला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे डॉ. आरोटे यांनी म्हटले आहे.

वृत्तावर आक्षेप असेल तर कायदेशीर मार्ग उपलब्ध!

पत्रकाराने प्रसिद्ध केलेल्या बातमीबाबत कोणाला आक्षेप असल्यास कायदेशीर मार्गाने आपली बाजू मांडता येते. मात्र, मारहाण किंवा दबावाचा मार्ग स्वीकारणे योग्य नाही. खाकी वर्दी ही जनतेच्या संरक्षणासाठी आहे, पत्रकारांचा आवाज दाबण्यासाठी नाही. पोलीस आणि पत्रकार हे समाजहितासाठी काम करणारे दोन महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे त्यांच्यात संघर्ष नव्हे, तर परस्पर समन्वय असणे गरजेचे आहे, असे डॉ. आरोटे यांनी स्पष्ट केले.

बाळशास्त्री जांभेकर आणि लोकमान्य टिळक यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची परंपरा निर्माण केली. पत्रकार हा प्रशासनाचा विरोधक नसून समाजातील समस्या शासनापर्यंत पोहोचविणारा महत्त्वाचा दुवा आहे. अवैध व्यवसायांविरोधात वृत्त प्रसिद्ध होत असेल, तर त्याची दखल घेऊन संबंधित व्यवसायांवर नियमानुसार कारवाई करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असेल तर ते लोकशाहीला शोभणारे नाही.

गृहमंत्र्यांनी प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी!

मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्यावरील आरोपांची निष्पक्ष चौकशी करावी. चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी. तसेच संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याची गडचिरोली येथे बदली करावी आणि पत्रकार प्रिया खंडागळे यांची जाहीर माफी मागण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी डॉ. आरोटे यांनी केली. यासंदर्भात राज्य पत्रकार संघाच्या वतीने गृह विभागाकडे निवेदन देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

पत्रकारांच्या संयमाचा अंत पाहू नका!

पत्रकार प्रिया खंडागळे यांनी समाजहिताचा विषय निर्भीडपणे मांडल्याबद्दल डॉ. आरोटे यांनी त्यांचे अभिनंदन केले. पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावे, यासाठी प्रशासनाने त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ओळखली पाहिजे. पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटनांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे.

या प्रकरणाची तातडीने निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याची बदली करावी आणि पत्रकाराची जाहीर माफी मागावी. अन्यथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा डॉ. विश्वासराव आरोटे यांनी दिला.

पत्रकारितेचा आवाज दाबता येणार नाही; कारण हा आवाज कोण्या एका पत्रकाराचा नसून अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सामान्य जनतेचा आहे!

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!