Friday, April 17, 2026
HomeUncategorizedलोकांच्या जीवाशी खेळ; ताडीवाल्यांचा धंदा तेजीत

लोकांच्या जीवाशी खेळ; ताडीवाल्यांचा धंदा तेजीत

तात्काळ कारवाई करा; इम्रान खान यांची मागणी

भद्रावती न्यूज डेस्क ✍️

भद्रावती (प्रतिनिधी):
भद्रावती तालुक्यातील मानोरा फाटा व तांडा परिसरात रसायन मिसळून तयार केलेल्या बनावट ताडीची खुलेआम विक्री सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ही ताडी आरोग्यास अत्यंत घातक असून, ती पिल्यामुळे लोकांचे जीव धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या अवैध धंद्यातून काही लोक दररोज मोठ्या प्रमाणात पैसा कमावत असल्याची माहिती आहे. याबाबत यापूर्वीही तक्रारी व सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, तरीसुद्धा हा ताडीचा धंदा आजही जोरात सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

बनावट ताडी तयार करताना विविध रासायनिक पदार्थांचा वापर केला जात असल्याचे बोलले जात आहे. अशा ताडीमुळे पोटदुखी, चक्कर येणे, डोळ्यांना इजा होणे, यकृत बिघडणे तसेच जीवितहानीसारखे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणाची दखल भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव तसेच “जनसेवक”, “इम्रान खान” यांनी घेतली असून, त्यांनी यापूर्वीच पोलिस प्रशासनाला या बनावट ताडी विक्रीची सविस्तर माहिती दिली होती. मात्र, त्यानंतरही हा अवैध धंदा सुरूच असल्याने त्यांनी पुन्हा एकदा तात्काळ चौकशी करून छापेमारी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना इम्रान खान म्हणाले,
“बनावट व रासायनिक ताडीमुळे सामान्य माणसांचे आरोग्य गंभीर धोक्यात येत आहे. हा थेट लोकांच्या जीवाशी खेळ आहे. ही विक्री तात्काळ बंद करून दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे.”

दरम्यान, मानोरा फाटा व तांडा परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
“दररोज संध्याकाळी ही विषारी ताडी विकली जाते. युवक, वृद्ध सगळेच धोक्यात आहेत. प्रशासनाने आता तरी तातडीने पावले उचलावीत,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

या प्रकरणामुळे भद्रावती तालुक्यात बनावट ताडी विक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करून या अवैध धंद्यावर पूर्णपणे आळा घालावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!