प्रशासनाच्या भूमिकेवर सवाल; बदलीची मागणी, उपोषणाचा इशारा..!
भद्रावती (प्रतिनिधी),
चंद्रपूर न्यूज डेस्क ✍️
संताजी गृह निर्माण सोसायटी अंतर्गत असलेल्या खाजगी प्लॉट्सवर भद्रावती नगर परिषद प्रशासनाने दिलेल्या अतिक्रमण नोटिसमुळे शहरात वाद निर्माण झाला आहे. संबंधित प्लॉट्स हे संताजी गृह निर्माण सोसायटीचे असून, ते सोसायटी धारक व सभासदांच्या खाजगी मालकीचे आहेत. नगर परिषदेची या जागेवर कोणतीही मालकी नसताना नोटिस देण्याचे अधिकार कसे, असा थेट सवाल उपस्थित होत आहे.
तसेच नगर परिषदेच्या नोटिसनुसार ज्या प्लॉटवर कारवाईचा उल्लेख आहे, तो प्लॉट नगर परिषदेच्या मालकीचा नसून खाजगी सोसायटीच्या सभासदांचा असल्याचे कागदोपत्री स्पष्ट असल्याचा दावा नागरिक व सभासदांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन नोटिस दिल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
या प्रकरणाबाबत विचारणा करण्यासाठी माजी नगरसेवक अफझल भाई यांच्या नेतृत्वाखाली सोसायटी सभासदांचे शिष्टमंडळ माननीय मुख्याधिकारी, नगर परिषद भद्रावती यांना भेटण्याकरिता गेले होते. मात्र, यावेळी “मी तुमच्यासोबत बोलणार नाही, ज्यांचे काम आहे त्यांच्याशीच बोलेन” असे म्हणत माजी नगरसेवक व शिष्टमंडळातील सदस्यांशी अपमानास्पद वर्तन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेचा तीव्र निषेध करत संपूर्ण शिष्टमंडळाने रोष व्यक्त केला. नागरिकांच्या वतीने प्रश्न मांडणाऱ्या लोकप्रतिनिधींना डावलणे हा लोकशाही मूल्यांचा अपमान असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
यावेळी संबंधित मुख्याधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी, अशी ठाम मागणी शिष्टमंडळ व सोसायटी सभासदांनी केली.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत संताजी गृह निर्माण सोसायटी सभासद व नागरिकांच्या वतीने संबंधित प्रकाराचे सविस्तर निवेदन बल्लारपूरचे आमदार माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आले आहे.
निवेदनात खाजगी मालकीच्या प्लॉटवर नोटिस देण्याची कायदेशीर बाब, नगर परिषद प्रशासनाची भूमिका, तसेच शिष्टमंडळाशी करण्यात आलेल्या कथित अपमानास्पद वागणुकीची सविस्तर माहिती देत योग्य हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रसंगी सोसायटी सभासदांचे म्हणणे आहे की, नगर परिषद कायद्यानुसार खाजगी मालकीच्या जमिनीवर थेट नोटिस देण्याचा अधिकार नगर परिषदेला नाही, जोपर्यंत ती जागा सार्वजनिक वापराची किंवा नगर परिषदेच्या ताब्यातील नाही. तरीही नोटिस देण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की,
“ही लढाई कुणाविरोधात नसून, सोसायटी सभासदांच्या मालकी हक्कांसाठी आहे. कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन कारवाई व अपमान सहन केला जाणार नाही.”
प्रशासनाने तात्काळ स्पष्टीकरण द्यावे, नोटिस मागे घ्यावी व संबंधित मुख्याधिकाऱ्यांची बदली करावी, अन्यथा संपूर्ण संताजी नगरवासी उपोषणाला बसतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणासंदर्भात नगर परिषद प्रशासनाकडून अधिकृत भूमिका व पुढील निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रशासन या प्रकरणावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.


