घाट बंद… पण रेतीचा काळाबाजार सुरूच! हिरव्या नेटखाली तस्करीचा खेळ; कोणाच्या आशीर्वादाने धावतायत बोलेरो?
जेना घाटातून रेती माफियांचा बिनधास्त धंदा; प्रशासन फक्त बैठकीत व्यस्त?
चंद्रपूर , न्यूज डेस्क✍️
भद्रावती तालुक्यातील बंद घोषित करण्यात आलेल्या जेना घाटातून अवैध रेती तस्करीचा काळाबाजार आता अधिकच बिनधास्तपणे सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. शासनाने बंदी घातलेल्या घाटातूनच दिवस-रात्र रेतीचा उपसा होत असून, हिरव्या नेटखाली पिकअप आणि बोलेरो वाहनांतून खुलेआम रेती वाहतूक केली जात असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
विशेष म्हणजे ही वाहतूक एखाद्या लपूनछपून चालणाऱ्या धंद्यासारखी नसून, मुख्य रस्त्यांवरून भर दिवसा सुरू असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हिरव्या नेटखाली काळा धंदा?
स्थानिकांच्या माहितीनुसार, रेतीने भरलेल्या पिकअप आणि बोलेरो वाहनांच्या मागील डाळ्यावर हिरव्या रंगाचे नेट झाकले जाते. वरून पाहता सामान्य मालवाहतूक असल्याचा भास निर्माण केला जातो; मात्र प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर अवैध रेतीची वाहतूक सुरू असल्याचा आरोप आहे.
रात्रीच्या अंधारातच नव्हे तर सकाळ-संध्याकाळ मुख्य मार्गांवरून ही वाहने धावत असल्याने “कारवाई नेमकी कुठे आहे?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
मोठ्या कंपन्यांपर्यंत पुरवठा?
सूत्रांच्या माहितीनुसार, ग्रामीण भागासोबतच शहरातील बांधकामे आणि काही मोठ्या कंपन्यांपर्यंतही ही रेती पोहोचवली जात असल्याची चर्चा रंगली आहे. काही ठिकाणी रात्री उशिरा रेतीचे साठे उतरवले जात असल्याचेही सांगितले जाते.
जर हा प्रकार खरा असेल, तर हा फक्त स्थानिक स्तरावरील तस्करीचा विषय नसून मोठ्या साखळीचा भाग असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
“बंद घाटातून इतकी रेती बाहेर येते तरी कशी?”
जेना घाट शासनाने बंद घोषित केलेला असताना
रेतीचा उपसा कोण करतंय?
, वाहतूक करणारी वाहने कुणाची?
,तपासणी नाक्यांमधून ही वाहने जातात कशी?
, कारवाईपूर्वीच माहिती लीक होते का? आणि सर्वात महत्त्वाचा सवाल… या सगळ्यामागे कोणाचे संरक्षण आहे?
अशा चर्चांनी आता तालुक्यात जोर धरला आहे.
बैठका होतात… पण तस्करी थांबत नाही!
अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी बैठका आणि आदेश दिल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात तस्करी मात्र सुरूच असल्याचे वास्तव नागरिकांच्या नजरेस पडत आहे.
“कागदावर कारवाई आणि मैदानात मोकळीक” अशी संतप्त प्रतिक्रिया आता परिसरातून उमटू लागली आहे.
आवाज उठवणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
अवैध रेती तस्करीविरोधात बोलणाऱ्या काही नागरिकांना दबाव व धमक्यांचा सामना करावा लागत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेक जण उघडपणे बोलण्यास घाबरत असल्याचेही सांगितले जाते.
पुढील भागात मोठा खुलासा?
या संपूर्ण रेती साखळीमध्ये वापरली जाणारी संशयित वाहने, संबंधित मार्ग, स्थानिक पातळीवरील संपर्क आणि कथित आर्थिक व्यवहारांबाबत पुढील भागात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


