Wednesday, October 28, 2026
Homeचंद्रपूर“नेत्यांच्या सावलीत फिरून भविष्य घडत नसतं...!”

“नेत्यांच्या सावलीत फिरून भविष्य घडत नसतं…!”

तरुणाईने आधी स्वतःला सक्षम बनवावे!

✍️ रोखठोक लेखन ,शंकर बोरघरे

95 25 61 25 55 

आजकाल अनेक तरुण समाजकारण आणि राजकारणाच्या चमकदार दुनियेकडे एवढे आकर्षित झाले आहेत की, स्वतःच्या घरातील वास्तवच विसरू लागले आहेत. सोशल मीडियावर फोटो, मोठमोठे बॅनर, वाढदिवसाचे पोस्टर, नेत्यांच्या सावलीत फिरणे आणि स्वतःला “युवा नेता” म्हणवून घेणे… एवढंच अनेकांचं आयुष्य उरलं आहे.

कडू आहे… पण हेच वास्तव आहे!

घरात आई-वडील कष्टाने संसार चालवत आहेत…
स्वतःच्या खिशात पैसे नाहीत…
कुटुंबाची जबाबदारी उचलण्याची ताकद नाही…
पण गावात मात्र “भाई”, “समाजसेवक”, “युवा वाघ” म्हणून मिरवण्यात धन्यता मानली जाते.

जो तरुण स्वतःच्या घरासाठी दोन वेळच्या जेवणाची हमी देऊ शकत नाही, तो समाज बदलण्याच्या घोषणा देत फिरतोय.
स्वतःच्या आई-वडिलांच्या डोळ्यातील अश्रू दिसत नाहीत… पण स्टेटसवर “जनतेचा सेवक” लिहून मिरवण्यात अभिमान वाटतोय.

समाजसेवा वाईट नाही… राजकारणही वाईट नाही…
पण स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून केलेलं समाजकारण म्हणजे मूर्खपणा आहे.

आज अनेक तरुण नेत्यांच्या मागे फिरण्यात इतके हरवले आहेत की स्वतःची स्वप्ने, शिक्षण, व्यवसाय आणि भविष्य विसरून बसले आहेत. वेळ, पैसा आणि ऊर्जा खर्च करूनही शेवटी त्यांच्या हातात काहीच राहत नाही. ज्यांच्यासाठी आयुष्य घालवले, तेच लोक वेळ आल्यावर ओळखही देत नाहीत हे कटू वास्तव आहे.

ज्यांच्या मागे तुम्ही दिवस-रात्र फिरता, ते नेते त्यांच्या मुलांना मोठ्या शाळांत शिकवत आहेत…
त्यांचं भविष्य “सेट” करत आहेत…
आणि तुमच्या हातात फक्त झेंडा देत आहेत!

गरज संपली की कार्यकर्त्याची किंमत संपते हे आजचं वास्तव आहे.

पहिले स्वतःच्या घराची परिस्थिती बदला…
आई-वडिलांचे कष्ट कमी करा…
शिक्षण घ्या…
व्यवसाय उभारा…
स्वतःच्या पायावर खंबीर उभे रहा…

कारण स्वतः मजबूत असलेला माणूसच समाजाला आधार देऊ शकतो.

आज गरज आहे ती फोटोबाजीची नाही…
तर शिक्षण, रोजगार, स्वाभिमान आणि कर्तृत्वाची आहे.

भावांनो..
नेत्यांच्या सावलीत फिरून काही काळ टाळ्या मिळतील…
पण स्वतःच्या कर्तृत्वाने उभे राहिलात तर संपूर्ण जग सलाम करेल!

✍️ शंकर बोरघरे

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!