Sunday, July 5, 2026
Homeचंद्रपूरभद्रावतीतील दस्त नोंदणी प्रकरण; ४ हजारांच्या लाचेवर एसीबीचा दणका

भद्रावतीतील दस्त नोंदणी प्रकरण; ४ हजारांच्या लाचेवर एसीबीचा दणका

दस्त नोंदणीसाठी ४ हजारांची लाच; दुय्यम निबंधक व ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात

भद्रावतीतील मालमत्ता नोंदणीसाठी पैशांची मागणी; एसीबीच्या कारवाईने नोंदणी विभागात खळबळ

चंद्रपूर, न्यूज डेस्क ✍️
शंकर बोरघरे ,मो. ९५२५६१२५५५

भद्रावती तालुक्यातील मालमत्तेच्या दस्त नोंदणीसाठी चार हजार रुपयांची लाच मागणाऱ्या चंद्रपूर येथील दुय्यम निबंधक श्रेणी-१ अधिकाऱ्यासह त्याच्या ऑपरेटरविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धडक कारवाई केली आहे. तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, मुद्रांक व नोंदणी विभाग, चंद्रपूर कार्यालयातील दुय्यम निबंधक श्रेणी-१ मोहन चंद्रकांत शेट्टीवार यांनी तक्रारदाराच्या पक्षकारांच्या भद्रावती तालुक्यातील मालमत्तेच्या दस्त नोंदणीचे काम करून देण्यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे दोन नोंदणींसाठी एकूण ४ हजार रुपयांची लाच मागितली होती. संबंधित रक्कम त्यांनी त्यांच्या डेटा ऑपरेटरमार्फत स्वीकारण्याचे निश्चित केले होते.

तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १६ जून २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहून तक्रार नोंदविली. तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचून आरोपीच्या सांगण्यावरून ऑपरेटरमार्फत स्वीकारली जाणारी ४ हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली.

या प्रकरणी पुढील तपास सुरू असून संबंधितांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नोंदणी विभागात एकच खळबळ उडाली असून शासकीय कार्यालयांतील लाचखोरीविरोधात एसीबीने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अनिल झिट्टावार यांच्या नेतृत्वात पार पडली. कारवाईत पोलिस निरीक्षक सचिन धर्मेजवार, हिवराज नेवारे, रविकांत इंगळे, विजेंद्र वाढई, अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदीप ताडाम, सचिन गजभिये, महेश माहुरपवार, मेघा मोहुर्ले, सतीश सिडाम तसेच संदीप कोरासे यांनी सहभाग घेतला.

दरम्यान, कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने काम करणारा एजंट शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त पैशांची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन विभागाने केले आहे. नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक १०६४ उपलब्ध असून भ्रष्टाचाराविरोधातील लढ्यात जनतेने पुढे यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!