Friday, September 4, 2026
Homeभद्रावतीखर्रा विक्रीवर परिविक्षाधीन पोलीस अधिकाऱ्याची धडाकेबाज कारवाई; अतिक्रमणातील टपऱ्यांवरही कारवाई होणार का?

खर्रा विक्रीवर परिविक्षाधीन पोलीस अधिकाऱ्याची धडाकेबाज कारवाई; अतिक्रमणातील टपऱ्यांवरही कारवाई होणार का?

पोलिसांचा खर्रा विक्रेत्यांना दणका; आता अतिक्रमित टपऱ्यांकडे नगर परिषदेचे लक्ष कधी?

भद्रावती , न्यूज डेस्क शंकर बोरघरे, 95 52 61 25 55 

भद्रावती तालुक्यात अवैध सुगंधित तंबाखूजन्य खर्रा विक्रीविरोधात परिविक्षाधीन पोलीस अधिकारी सचिन खत्रे यांनी धडाकेबाज कारवाई करत अवैध खर्रा विक्रेत्यांना चांगलाच दणका दिला आहे. नुकताच पदभार स्वीकारलेल्या या अधिकाऱ्याने अवैध धंद्यांविरोधात दाखविलेली आक्रमकता सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरत असून, ‘नव्या अधिकाऱ्याची एन्ट्री, खर्रा विक्रेत्यांची धावपळ!’ असे चित्र निर्माण झाले आहे.

खर्रा विक्रीच्या आडून नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने संबंधित विक्रेत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. परिविक्षाधीन पोलीस अधिकारी सचिन खत्रे यांच्या कारवाईमुळे अवैध खर्रा विक्री करणाऱ्यांना आता पोलिसांची नजर आपल्यावर असल्याची जाणीव झाली आहे. त्यांच्या या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

मात्र, पोलिसांच्या कारवाईनंतर आता नगर परिषद प्रशासनाच्या भूमिकेकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे. नगर परिषद हद्दीत खर्रा विक्री करणाऱ्या काही टपऱ्या सार्वजनिक जागा अथवा अतिक्रमित जागेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे खर्रा विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली असली, तरी त्या टपऱ्या ज्या जागेवर उभ्या आहेत, त्या अतिक्रमणाचा प्रश्न कोण सोडवणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

एकीकडे पोलिस अधिकारी अवैध खर्रा विक्रीविरोधात धडाकेबाज कारवाई करून ‘फिल्डवर’ दिसत आहेत, तर दुसरीकडे अतिक्रमित टपऱ्यांकडे नगर परिषद प्रशासनाची नजर कधी जाणार? अशी मिश्कील चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

साहेबांनी खर्र्याचा बंदोबस्त केला; आता नगर परिषद प्रशासन टपऱ्यांचा बंदोबस्त करणार का? असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे, खर्रा विक्रीचा प्रश्न केवळ आरोग्याशी संबंधित नसून सार्वजनिक जागेचा वापर आणि अतिक्रमणाचाही विषय आहे. त्यामुळे पोलिस विभागाने आपली कारवाई सुरू ठेवतानाच नगर परिषद प्रशासनानेही अतिक्रमित टपऱ्यांची पाहणी करून नियमाप्रमाणे कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

परिविक्षाधीन पोलीस अधिकारी सचिन खत्रे यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे खर्रा विक्रेत्यांमध्ये धडकी भरली असताना, आता नगर परिषद प्रशासनही पुढे येऊन अतिक्रमणावर कारवाईचा हातोडा चालवणार का, याकडे संपूर्ण भद्रावतीकरांचे लक्ष लागले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!