टप्पा चौकात सिग्नल सुरू; अपघातांना बसणार आळा!
आमदार करण देवतळे यांच्या पाठपुराव्याला यश; पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या प्रयत्नांनंतर वाहतुकीला लागणार शिस्त, भाजयुमोच्या वतीने सत्कार
भद्रावती , न्यूज डेस्क
शंकर बोरघरे , 95 52 61 25 55
भद्रावती शहरातील टप्पा चौकात वाढती वाहतूक, वाहनांची गर्दी आणि वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अखेर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. सिग्नल सुरू झाल्यामुळे वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, आता चौकातील वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत होणार आहे.
टप्पा चौकात सिग्नल सुरू करण्यासाठी भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार करण संजय देवतळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्याचबरोबर भद्रावती पोलीस ठाण्याचे निरीक्षक योगेश्वर पारधी यांनीही या विषयासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून सिग्नल प्रत्यक्षात कार्यान्वित झाला आहे.
टप्पा चौक हा शहरातील वर्दळीचा परिसर असल्याने येथे वाहनांची मोठी ये-जा असते. सिग्नल सुरू झाल्यामुळे वाहनांची मनमानी कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. तसेच वाहतूक नियमांचे पालन झाल्यास चौकातील अपघातांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या महत्त्वपूर्ण कामासाठी पुढाकार घेणारे आमदार करण देवतळे आणि पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांचा भाजप युवा मोर्चा भद्रावती शहराच्या वतीने भाजयुमो प्रदेश सचिव इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल पंप चौकात सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजयुमो प्रदेश सचिव इम्रान खान, माजी शहराध्यक्ष प्रवीण सातपुते, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, अमित गुंडावार, माधव बांगडे, अनिकेत नाकाडे, मोनू पारधी, श्रीपाद भाकरे, गोविंदा बिजवे, तौसिफ शेख, शिवा कवायतदार, बबलू सय्यद, मधु सावंतकर, सतीश आष्टांकर, प्रशांत झाडे, सुनील बोरकुटे, महेश लोणकर, जीवन आडेकर, मुकेश बनीक, मनोज आष्टणकर, कवीश्वर शेंडे आणि स्वप्निल बारसागडे यांच्यासह भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
टप्पा चौकात सिग्नल सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, सिग्नलमुळे वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र सिग्नल सुरू झाल्यानंतर वाहनचालकांनीही वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.
सिग्नल लागला, आता नियम पाळा अन् टप्पा चौकातील अपघातांना कायमचा ब्रेक लावा!


