Friday, September 11, 2026
Homeचंद्रपूरउत्पन्नाचा दाखला काढताना ‘लाचेचा अड्डा’… एसीबीची धडक एन्ट्री!

उत्पन्नाचा दाखला काढताना ‘लाचेचा अड्डा’… एसीबीची धडक एन्ट्री!

 गोरगरीबांच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर ‘लाचेचा डाव’… एसीबीची धडक कारवाई!

गडचांदूर येथे ८१ रुपयांच्या कथित लाचेवर सापळा; सरकारमान्य सेतू केंद्राशी संबंधित व्यक्ती ताब्यात

चंद्रपूर,  न्यूज डेस्क शंकर बोरघरे

95 52 61 25 55

गोरगरीब व सामान्य नागरिकांना विविध शासकीय योजना, शिष्यवृत्ती तसेच अन्य शासकीय लाभ मिळविण्यासाठी उत्पन्नाचा दाखला अत्यंत महत्त्वाचा असतो. अशा आवश्यक शासकीय कागदपत्रासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त रकमेची कथित मागणी झाल्याच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), चंद्रपूरने गडचांदूर येथे धडक सापळा कारवाई केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, तक्रारदाराने गडचांदूर येथील त्रिशा ऑनलाइन सर्व्हिसेस या सरकारमान्य सेतू केंद्रात उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी संपर्क केला होता. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी पडताळणी करण्यात आली.

पडताळणीदरम्यान उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणारे ६९ रुपये शासकीय शुल्क व ८१ रुपये कथित लाचेची रक्कम, असे एकूण १५० रुपये स्वीकारण्यास संबंधिताने तयारी दर्शविल्याचे अधिकृत प्रेस नोटीत नमूद आहे.

त्यानंतर एसीबीच्या चंद्रपूर पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला. अधिकृत माहितीनुसार, ६९ रुपये शासकीय शुल्क व ८१ रुपये कथित लाचेची रक्कम, असे एकूण १५० रुपये पंचांसमक्ष स्वीकारताना संबंधितास ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली आहे.

अनिल जिट्टावार यांच्या पर्यवेक्षणाखाली कारवाई…

या सापळा कारवाईचे पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर यांनी केले. गोरगरीब व सामान्य नागरिकांच्या आवश्यक शासकीय कामांमध्ये भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी एसीबीचे पथक सतर्क असल्याचा संदेश या कारवाईतून मिळत आहे.

सापळा कारवाईत पोलीस निरीक्षक प्रशांत केदार, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर यांनी सापळा अधिकारी म्हणून कारवाई केली.

एसीबीच्या पथकाची प्रभावी कामगिरी

या कारवाईत पोलीस हवालदार हिवराज बोरे, पोलीस हवालदार रविकांत इंगळे, पोलीस शिपाई अमोल सिंगम, पोलीस शिपाई राकेश जांभुळकर, पोलीस शिपाई प्रदीप ताडम, महिला पोलीस शिपाई मेधा मोहळे, पोलीस शिपाई सतीश सिडाम तसेच पोलीस शिपाई संदीप कवरासे यांनी सहभाग घेतला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर आणि अपर पोलीस अधीक्षक विजय माहुरकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

गोरगरीब व सामान्य नागरिकांना आवश्यक असलेल्या उत्पन्नाच्या दाखल्यासारख्या शासकीय कागदपत्रांसाठी अतिरिक्त पैशांचा कथित बोजा पडू नये आणि भ्रष्टाचाराविरोधात नागरिकांनी निर्भयपणे पुढे यावे, असा संदेश या कारवाईतून मिळत आहे.

 लाच मागितली तर चंद्रपूर एसीबीला कळवा!

भ्रष्टाचारासंदर्भात कोणतीही माहिती असल्यास किंवा लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर
०७१७२-२५०२५१ , एक्स्टेंशन :- १०६४
पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार : ९८२३२७०५८१

शंकर बोरघरे, चंद्रपूर

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!