भद्रावतीत एकल महिलांचे सर्वेक्षण; पात्र महिलांनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन
भद्रावती, न्यूज डेस्क ,
शंकर बोरघरे,
मो. ९५५२६१२५५५
नगर परिषद भद्रावतीच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत शहरातील एकल महिलांचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
या सर्वेक्षणामध्ये विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित तसेच अविवाहित माता-भगिनींची नोंदणी करण्यात येणार आहे. शहरातील पात्र महिलांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यक व योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सर्वेक्षणासाठी आधार कार्ड, घटस्फोटित असल्याचा दाखला (लागू असल्यास), रेशन कार्ड तसेच इतर आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती तयार ठेवाव्यात. पात्र महिलांनी सर्वेक्षणामध्ये आपली नोंद करून घेऊन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक माहिती व कागदपत्रे ऑनलाईन पोर्टलवर सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील एकही पात्र महिला या सर्वेक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित महिलांनी तातडीने नोंदणी करून घ्यावी, असेही नगर परिषदेकडून सांगण्यात आले आहे.
या सर्वेक्षणासाठी शहर अभियान व्यवस्थापक ज्योती लालसरे (मो. ८६००७५८१८८) तसेच समुदाय संघटक सुरेखा आत्राम (मो. ९३७०५५६७१७) यांच्याशी संपर्क साधता येईल.
नगराध्यक्ष प्रफुल चटकी, उपाध्यक्ष सुधीर सातपुते, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती शोभाताई पारखी आणि मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.


