Tuesday, October 27, 2026
Homeभद्रावतीडॉक्टरांच्या खोलीत एसी, रुग्णांच्या कक्षात घाम! भद्रावतीत सुविधांचा अजब कारभार

डॉक्टरांच्या खोलीत एसी, रुग्णांच्या कक्षात घाम! भद्रावतीत सुविधांचा अजब कारभार

कुलर रुग्णालयात, पण रुग्णांच्या कक्षात नाही!

भद्रावती ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना उष्णतेचा ‘विशेष उपचार’; प्रशासनाला थेट सवाल!

भद्रावती, न्यूज डेस्क शंकर बोरघरे, 95 52 61 25 55 

ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना आजारासोबतच असह्य उष्णतेचाही सामना करावा लागत असल्याची तक्रार आहे. रुग्णांच्या कक्षात कुलरची व्यवस्था असतानाही ते काढून ठेवण्यात आल्याने रुग्ण आणि नातेवाईक हैराण झाले आहेत.

रुग्ण…. “साहेब, आजार बरा करण्यासाठी रुग्णालयात आलो होतो; पण इथे तर घाम काढण्याचा उपचार मोफत सुरू आहे!”

नातेवाईक …“कुलर कुठे आहे?”

रुग्ण … “कुलर आहे… पण आमच्यासाठी नाही! बहुतेक तोही सध्या ‘विश्रांती’ घेत असावा!”

नातेवाईक…. “मग पंखा तरी चालतोय ना?”

रुग्ण … “पंखा चालतोय, पण हवा कुठे आहे हे पंख्यालाच माहीत!”

पंख्यांमधून पुरेशी हवा मिळत नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची चांगलीच तारांबळ उडत आहे.

एक नातेवाईक म्हणाला … “रुग्णाला आराम मिळावा म्हणून दाखल केलं. आता रुग्णाला आराम द्यायचा की हातपंखा घेऊन आम्हीच सेवा करायची?”

दरम्यान, डॉक्टरांच्या कक्षात वातानुकूलित सुविधा उपलब्ध असताना रुग्णांच्या कक्षातील कुलर बंद असल्याची चर्चा रुग्णालय परिसरात रंगली आहे.

रुग्ण…“डॉक्टरांना थंड हवा, आम्हाला गरम हवा… हा उपचारातील नवीन प्रोटोकॉल आहे का?”

नातेवाईक … “कुलर सुरू करण्यासाठी अर्ज करायचा का?”

रुग्ण …“अर्ज करा, त्यावर सही घ्या, मग सही करणाऱ्याच्या सहीसाठी पुन्हा अर्ज करा… तोपर्यंत पावसाळा संपेल!”

प्रशासनाला थेट सवाल!

रुग्णांच्या कक्षातील कुलर काढून ठेवण्याचा निर्णय नेमका कोणाचा?

कुलर उपलब्ध असताना ते बंद ठेवण्याचे कारण काय?

रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना असह्य उष्णतेचा त्रास होत असताना प्रशासन गप्प का?

पंख्यांमधून पुरेशी हवा मिळत नसेल, तर त्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी कोणाची?

रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न असताना मूलभूत सुविधा देण्यात दिरंगाई का?

डॉक्टरांच्या कक्षात वातानुकूलित सुविधा उपलब्ध असताना रुग्णांच्या कक्षातील कुलर बंद ठेवण्याचे निकष कोणते?

रुग्णांना थंड आणि हवेशीर वातावरण देणे ही रुग्णालय प्रशासनाची जबाबदारी नाही का?

कुलर सुरू करण्यासाठी रुग्णांनी आणि नातेवाईकांनी कुणाकडे दाद मागायची?

आणि सर्वात महत्त्वाचा सवाल

रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना असह्य उष्णतेचा त्रास सहन करावा लागणार असेल, तर या निष्काळजीपणाची जबाबदारी नेमकी कोण घेणार?

रुग्णालयात कुलर आहेत, पंखे आहेत, एसी आहेत… पण रुग्णांसाठी थंड हवा मात्र कुठे आहे?

आता आश्वासन नको, प्रत्यक्ष कृती हवी! कुलर सुरू करा, पंखे दुरुस्त करा आणि रुग्णांना त्यांच्या हक्काच्या मूलभूत सुविधा द्या.

नाहीतर उद्या रुग्णालयाच्या बाहेर असा फलक लावण्याची वेळ येईल

“येथे उपचारासोबत घाम काढण्याची सुविधाही उपलब्ध आहे!”

पुढील भागात..या प्रश्नांवर प्रशासन काय उत्तर देते? कुलर पुन्हा सुरू होतात का? की रुग्णांना आणखी एका ‘गरम’ उत्तराची प्रतीक्षा करावी लागणार?

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!