अंमली पदार्थांपासून सायबर फसवणुकीपर्यंत; भद्रावती पोलिसांचा जनजागृतीचा ‘पंच’
‘बाप्पा म्हणे’च्या माध्यमातून गणेश मंडळांना सुरक्षा संदेश; ११२, १९३०सह वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन
भद्रावती, न्यूज डेस्क ..शंकर बोरघरे
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत भद्रावती पोलिसांनी जनजागृतीचा विशेष उपक्रम राबविला आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहरी व ग्रामीण भागातील गणेश मंडळांना जनजागृतीपर बॅनर छापून वितरित करण्यात आले असून, त्यातून नागरिकांना विविध सुरक्षा संदेश देण्यात येत आहेत.
अंमली पदार्थांचे सेवन टाळण्यापासून ते सायबर फसवणूक, ‘डिजिटल अरेस्ट’, आपत्कालीन परिस्थिती आणि वाहतूक नियमांपर्यंत विविध विषयांवर नागरिकांना सावध करण्यात आले आहे. “अंमली पदार्थांना नाही, जीवनाला हो!” असा संदेश देत तरुणांनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन….
ऑनलाइन व्यवहार करताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये तसेच OTP, PIN किंवा इतर गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नये, असा संदेश भद्रावती पोलिसांनी दिला आहे. आर्थिक सायबर फसवणूक झाल्यास विलंब न करता १९३० या हेल्पलाइनवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाने होणाऱ्या फसवणुकीपासूनही नागरिकांनी सावध राहावे. फोनवरून गुन्हा दाखल झाल्याचे सांगून अटक किंवा चौकशीची भीती दाखविणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, असा इशारा देण्यात आला आहे.
वाहतूक नियमांचे पालन करा..
गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यांवर होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक सुरक्षेबाबतही जनजागृती करण्यात येत आहे. वाहन चालवताना हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करणे, वेगावर नियंत्रण ठेवणे, मद्यपान करून वाहन न चालवणे आणि वाहन चालवताना मोबाईलचा वापर न करणे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही पोलिसांनी आवाहन केले आहे.
गणेश मंडळांच्या माध्यमातून थेट नागरिकांपर्यंत संदेश…
भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहरी तसेच ग्रामीण भागातील गणेश मंडळांना जनजागृतीपर बॅनर वितरित करून हे संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवतानाच नागरिकांची सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
‘बाप्पा म्हणे…सावध रहा, सुरक्षित रहा!’ या संदेशातून भद्रावती पोलिसांनी गणेशोत्सवाला सुरक्षिततेची जोड दिली आहे.


