Tuesday, October 27, 2026

अंमली पदार्थांपासून सायबर फसवणुकीपर्यंत; चंद्रपूर पोलिसांचा जनजागृतीचा ‘पंच’

‘बाप्पा म्हणे’च्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षा संदेश; ११२, १९३०सह वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

भद्रावती न्यूज डेस्क ✍️

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी चंद्रपूर पोलिसांनी जनजागृतीचा विशेष उपक्रम राबविला आहे. अंमली पदार्थांचे सेवन, सायबर फसवणूक, ‘डिजिटल अरेस्ट’, आपत्कालीन परिस्थिती आणि वाहतूक नियम अशा विविध विषयांवर ‘बाप्पा म्हणे’च्या माध्यमातून नागरिकांना सावध करण्यात येत आहे.

“अंमली पदार्थांना नाही, जीवनाला हो!” असा स्पष्ट संदेश देत पोलिसांनी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती केली आहे. अंमली पदार्थांमुळे आरोग्याचे नुकसान, करिअरचा ऱ्हास, कुटुंबापासून दुरावा आणि गुन्हेगारीकडे वाढणारा कल निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अंमली पदार्थांबाबत माहिती असल्यास पोलिसांना गोपनीयरीत्या माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फसवणूक झाली? १९३० वर तातडीने संपर्क

सायबर आर्थिक फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे, असा संदेशही पोलिसांकडून देण्यात आला आहे. संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, OTP, PIN किंवा इतर गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नये, तसेच ऑनलाइन व्यवहार करताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आर्थिक सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या हेल्पलाइनवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाने फसवणूक

‘डिजिटल अरेस्ट’ ही कोणतीही कायदेशीर अटक प्रक्रिया नसून, त्याच्या नावाखाली सायबर फसवणूक केली जाऊ शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. फोनवरून गुन्हा दाखल झाल्याचे सांगून अटक करण्याची किंवा घरबसल्या चौकशीची भीती दाखविणाऱ्या व्यक्तींपासून नागरिकांनी सावध राहावे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

‘SAFE DRIVE, SAFE LIFE’चा संदेश

वाहतूक सुरक्षेबाबतही पोलिसांनी विशेष जनजागृती केली आहे. वाहन चालवताना हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करणे, वेगावर नियंत्रण ठेवणे, मद्यपान करून वाहन न चालवणे आणि वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणे, अशा नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत ११२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

भद्रावती पोलिसांकडून गणेश मंडळांना बॅनर

दरम्यान, भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक गणेश मंडळाला जनजागृतीपर बॅनर छापून वितरित करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सुरक्षा, सायबर गुन्हे, वाहतूक नियम आणि आपत्कालीन मदतीबाबत अधिकाधिक सतर्कता निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

‘बाप्पा म्हणे’तून सुरक्षिततेचा संदेश

गणरायाच्या आकर्षक प्रतिमेसोबत पोलिसांच्या गणवेशातील बाप्पाच्या माध्यमातून सुरक्षा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. धार्मिक वातावरणाला सामाजिक सुरक्षिततेच्या संदेशाची जोड देत चंद्रपूर पोलिसांनी गणेशोत्सवात “सावध रहा, सुरक्षित रहा” असा थेट संदेश नागरिकांना दिला आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!