वैयक्तिक वादाला धार्मिक रंग; रोशन कोमरेड्डिवार..!
राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन; प्रसारमाध्यमांतूनही माहिती
भद्रावती न्यूज डेस्क ✍️
भद्रावती शहरातील सामाजिक सलोखा व सर्वधर्मसमभाव कायम राखण्यासाठी प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस अधीक्षकांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले असून, संबंधित गंभीर प्रकाराबाबत प्रसारमाध्यमांनाही सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
प्रसंगी शहरातील एका जबाबदार व्यक्तीने काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर अपलोड केलेल्या व्हिडिओत, एका बिर्याणी व्यावसायिकासोबत झालेल्या वैयक्तिक वादाला जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लिम वादाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
हा प्रकार भद्रावतीतील शांतता, सौहार्द आणि सामाजिक ऐक्यास धोका निर्माण करणारा असून, सर्वधर्मसमभावाला तडा देणारा असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान शहरातील सर्व धर्मांचे नागरिक गुण्यागोविंदाने राहत असून, एकमेकांच्या सण-उत्सवांमध्ये सहभागी होण्याची परंपरा आहे. शिवजयंती हिंदू-मुस्लिम समाज एकत्र येऊन उत्साहात साजरी करतात, तर रामनवमीच्या शोभायात्रेचे मुस्लिम बांधवांकडून स्वागत केले जाते. अशा सौहार्दपूर्ण वातावरणात वैयक्तिक वादाला धार्मिक रंग देणे अयोग्य असून, समाजात तेढ निर्माण करणारे कृत्य असल्याचे निवेदनात ठामपणे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, तसेच भविष्यात सोशल मीडियावरून अशा स्वरूपाचे प्रकार घडू नयेत यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जनतेपर्यंत वस्तुस्थिती पोहोचावी आणि गैरसमज पसरू नयेत, या उद्देशाने प्रसारमाध्यमांतूनही माहिती देण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
निवेदन सादर करताना अकिफ खान, अमोल बडगे, प्रवीण सिंग, शुभम बगडे, विजय डोंगरे, अजय वावरे, जाहिद पठाण, रमीज शेख, प्रथम शेंडे, अख्तर अली, पंकज चिलके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


