Wednesday, July 29, 2026
Homeभद्रावतीपिके गेली, धूळ आली; पंचनामा फिरतोय फाईलमध्येच!

पिके गेली, धूळ आली; पंचनामा फिरतोय फाईलमध्येच!

धूळ नियंत्रण नाही, भरपाई निश्चित नाही; शेतकऱ्यांचा संयम संपतोय

भद्रावती (कोंढा, प्रतिनिधी):
के.पी.सी.एल. कंपनीच्या कोळसा वाहतुकीसाठी सुरू असलेल्या जड वाहनांनी कोंढा, कडोली, किलोनी व चिचोली परिसरातील शेतकऱ्यांची शेती थेट धुळीत घातली आहे. रस्त्यालगतच्या शेतांवर दिवस, रात्र उडणाऱ्या धुळीमुळे उभी पिके जमीनदोस्त झाली, मात्र नुकसान भरपाई मात्र आजही “फाईल फिरतीवर”च असल्याचे चित्र आहे.

या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या. दि. ७ फेब्रुवारी २०२३ रोजी पंचनामे झाले, भरपाईचे आदेशही निघाले. नंतर दि. १७ डिसेंबर २०२४ रोजी पुन्हा पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले. म्हणजे पंचनामा झाला, पुन्हा झाला… कागद चालत राहिले; पण भरपाई मात्र आजही कुठेच दिसत नाही, असा थेट सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

शेतकऱ्यांचे पिक गेले, मेहनतीचा खर्च बुडाला, तरी के.पी.सी.एल.ची वाहतूक मात्र बिनधास्त सुरू आहे. धूळ थेट शेतीत जाते, पंचनामा आरामात कागदावर फिरतो आणि शेतकऱ्यांच्या हातात शेवटी फक्त आदेशांच्या प्रतीच उरतात, अशी उपरोधिक पण विदारक परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, धुळीचा फटका केवळ शेतीपुरता मर्यादित नसून रस्त्यालगतच्या घरांतील अन्नधान्य व घरगुती साहित्यही धुळीत झाकले जात आहे. मात्र प्रत्यक्षात भरपाईचा निर्णय जमिनीवर उतरण्याऐवजी फाईलमध्येच फेरफटका मारत असल्याने शेतकऱ्यांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे.

या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन के.पी.सी.एल. कंपनीला नुकसान भरपाई देण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा स्पष्ट इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटना यांच्या वतीने देण्यात आला आहे. “न्याय नसेल तर संघर्ष अटळ,” असा सूर असून, पुढचा पंचनामा नेमका कुठल्या फाईलमध्ये फिरणार, असा बोचरा टोमणाही शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

निवेदन सादर करतेवेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रफुल थेरे, मिथुन गोंडे, शंकर मत्ते, सुहास चिकटे, शैलेश गोंडे, स्वप्निल डाहुले, विवेक मत्ते, नंदकिशोर गोंडे, राजू मत्ते, किसन थेरे, रोशन घोरपडे, गणेश जिवतोडे, शुभम सुर, विनोद चिकटे, विलास राजुरकर, नरेंद्र नागपुरे, पद्माकर पुनवटकर, अरुण कोल्हेकर यांच्यासह पीडित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!