Friday, April 17, 2026
Homeचंद्रपूरज्ञान, समता आणि स्वाभिमानाचा महामंत्र देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ज्ञान, समता आणि स्वाभिमानाचा महामंत्र देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

चंद्रपूर न्यूज डेस्क 

१४ एप्रिल हा दिवस केवळ एका महान व्यक्तीच्या जन्माचा स्मरणदिन नाही तर तो भारतीय समाजव्यवस्थेला हादरा देणाऱ्या अन्यायाच्या मुळावर प्रहार करणाऱ्या आणि समतेचा ध्वज उंचावणाऱ्या क्रांतिकारी विचारांचा दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव म्हणजे केवळ व्यक्तिमत्त्व नाही तर ते अन्यायाविरुद्धचा एल्गार, शोषितांच्या हक्कांसाठीचा ज्वालामुखी आणि सामाजिक क्रांतीचे प्रतीक आहे.
भारतीय समाजातील हजारो वर्षांची जातीय विषमता, अस्पृश्यता आणि सामाजिक गुलामी यांना उखडून टाकण्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी केवळ विचार मांडले नाहीत तर त्या विचारांसाठी रस्त्यावर उतरून लढा दिला. महाडचा चवदार तळे सत्याग्रह असो किंवा नाशिकचा कालाराम मंदिर प्रवेश आंदोलन — प्रत्येक ठिकाणी त्यांनी अन्यायाच्या विरोधात उभे राहत समाजाला जागृत केले.
आजही प्रश्न उपस्थित होतो की बाबासाहेबांनी ज्या समतेच्या भारताचे स्वप्न पाहिले तो भारत आपण घडवू शकलो आहोत का? संविधानाने दिलेले हक्क कागदावरच राहिले नाहीत ना? सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विषमता आजही मोठ्या प्रमाणावर दिसून येते. ही वस्तुस्थिती आपल्या व्यवस्थेवर आणि राजकारणावर प्रश्नचिन्ह निर्माण करते.
डॉ. आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितले होते की “राजकीय लोकशाही टिकवायची असेल तर सामाजिक लोकशाही आवश्यक आहे.” परंतु आजच्या परिस्थितीत सामाजिक लोकशाही कितपत रुजली आहे हा गंभीर चिंतेचा विषय आहे. जातीच्या आधारावर राजकारण करणाऱ्या आणि समाजात फूट पाडणाऱ्या प्रवृत्तींना अजूनही खतपाणी मिळत आहे. हे बाबासाहेबांच्या विचारांना विरोध करणारे आहे.
संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांनी भारताला एक मजबूत लोकशाही दिली. पण केवळ संविधान बनवणे पुरेसे नाही तर त्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे होणे आवश्यक आहे. आज अनेक ठिकाणी संविधानाच्या मूल्यांची पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसते. अशा वेळी बाबासाहेबांचे विचार अधिक तीव्रतेने पुढे आणणे गरजेचे आहे.
बाबासाहेबांनी दिलेला “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश आजही तेवढाच प्रभावी आहे पण तो केवळ घोषणांपुरता मर्यादित राहू नये. शिक्षणाचा प्रसार, सामाजिक जागृती आणि संघटित लढा यांच्याशिवाय खऱ्या अर्थाने परिवर्तन शक्य नाही. समाजातील वंचित घटकांना केवळ आश्वासने नकोत तर त्यांना न्याय, संधी आणि सन्मान हवा आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी बाबासाहेबांनी केलेले कार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. आज महिलांच्या सुरक्षिततेचे आणि समानतेचे प्रश्न अजूनही कायम आहेत ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे स्त्री-पुरुष समानतेचे विचार आजच्या काळात अधिकच सुसंगत ठरतात.
आजच्या राजकीय परिस्थितीत बाबासाहेबांचे नाव घेतले जाते पण त्यांच्या विचारांचे पालन कितपत केले जाते हा मोठा प्रश्न आहे. केवळ जयंती साजरी करून पुष्पहार अर्पण करून आणि भाषणे देऊन बाबासाहेबांना अभिवादन करणे पुरेसे नाही. त्यांच्या विचारांची अंमलबजावणी करणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल.
या जयंतीनिमित्त प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपण खरंच समतेच्या, न्यायाच्या आणि बंधुत्वाच्या मूल्यांना स्वीकारले आहे का? की अजूनही आपण जुन्या रूढी, भेदभाव आणि अन्यायाच्या चक्रात अडकून आहोत?
बाबासाहेबांचे विचार हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण राष्ट्रासाठी आणि मानवतेसाठी आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा जपणे आणि त्याला कृतीत उतरवणे ही आजच्या पिढीची जबाबदारी आहे. अन्यथा जयंती साजरी करणे ही केवळ एक औपचारिकता ठरेल.
चला.. या जयंतीनिमित्त आपण केवळ अभिवादन न करता परिवर्तनाचा संकल्प करूया. अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया समतेसाठी लढूया आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया.

ॲड. राहुल थोरात

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई 

जिल्हाध्यक्ष डिजिटल मिडिया, चंद्रपूर
मो. 8421318010

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!