Friday, April 17, 2026
Homeचंद्रपूरदारू + गाडी = थेट कारवाई; पोलिसांचा स्पष्ट इशारा

दारू + गाडी = थेट कारवाई; पोलिसांचा स्पष्ट इशारा

नियमभंगाला लगाम; कोटींचा दंड वसूल

API माया वाडे यांचे प्रभावी नेतृत्व; महामार्ग पोलीस ठरले रस्त्यावरील खरे रक्षक..!

चंद्रपूर न्यूज डेस्क ✍️

चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी महामार्ग पोलीस मदत केंद्र, चंद्रपूर यांनी सन २०२५, २६ या कालावधीत राबविलेली विशेष मोहीम अत्यंत प्रभावी ठरली आहे. वर्षभर सातत्यपूर्ण, नियोजनबद्ध आणि कडक कारवाईमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, जिल्ह्यातील वाहतूक शिस्तीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे.

महामार्ग पोलिसांच्या अधिकृत आकडेवारीनुसार, या कालावधीत २०,३९६ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली असून, त्यातून १ कोटि ७० लाख ७९ हजार ७०० इतका दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईत दारू पिऊन वाहन चालवणे (ड्रंक अँड ड्राईव्ह), वेगमर्यादा उल्लंघन, सिग्नल तोडणे तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांचा समावेश आहे.

ही मोहीम पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. तर सहा. पोलीस निरीक्षक (API) माया वाडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सातत्याने काम करत ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे.

महामार्ग पोलिसांनी वर्षभर विविध ठिकाणी नाकाबंदी, विशेष तपासणी मोहिमा आणि ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी प्रभावीपणे राबवली. विशेषतः रात्रीच्या वेळी ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात कडक कारवाई करण्यात आली. नियमभंग करणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयीन कारवाई देखील करण्यात आली आहे.

याशिवाय, पोलिसांनी जनजागृतीवर भर देत नागरिकांना HSRP नंबर प्लेट, रिफ्लेक्टर, इंडिकेटर यांसारख्या सुरक्षात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी विविध उपक्रम राबवून वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून देण्यात आले.

महामार्ग पोलिसांच्या या सातत्यपूर्ण कारवाईमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेत सकारात्मक बदल दिसून येत आहेत. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरत आहे. “दारू पिऊन वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा आहे; अशा प्रकारांवर पुढेही कठोर कारवाई सुरूच राहील,” असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, उत्कृष्ट कामगिरीबद्दल माया वाडे यांना “सर्वोत्कृष्ट कामगिरी” म्हणून प्रथम पुरस्कार देण्यात आला असून, संपूर्ण पथकाच्या कार्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

महामार्ग पोलीस चंद्रपूर यांची ही मोहीम केवळ दंड वसुलीपुरती मर्यादित नसून, ती नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची ठरत आहे. रस्त्यावर शिस्त निर्माण करून अपघातांवर नियंत्रण मिळवण्यात या मोहिमेची मोठी भूमिका असून, नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे ही काळाची गरज असल्याचे पुन्हा चर्चेचा भाग झाला आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!