चंद्रपूर, न्यूज डेस्क
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तथा, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई राजुरा तालुकाध्यक्ष
✍️प्रा. अनंत डोंगे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई जिल्हा शाखा चंद्रपूर तालुका राजुरा यांच्या वतीने १४ एप्रिल रोजी संविधान चौक येथे मँगो ज्यूस व फळ वितरणाचा सेवाभावी उपक्रम उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पार पडला.
समता, बंधुता आणि न्याय या आंबेडकरी विचारांचा प्रसार व्हावा तसेच समाजातील सर्व स्तरातील नागरिकांमध्ये एकात्मतेची भावना दृढ व्हावी, या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मँगो ज्यूस व ताज्या फळांचे वाटप करत आरोग्यसेवा आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम साधण्यात आला.
सकाळपासूनच संविधान चौक परिसरात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या उपक्रमाचे स्वागत केले व आयोजकांचे कौतुक केले. उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले आणि समाजात समता, न्याय व बंधुता या मूल्यांची जपणूक करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष प्रा. महेश पानसे व जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे यांचे मार्गदर्शन लाभले. डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष ॲड. राहुल थोरात तसेच राजुरा तालुका अध्यक्ष प्रा. अनंत डोंगे यांच्या नेतृत्वात संपूर्ण उपक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी डिजिटल मीडिया सचिव राकेश कलेगुरवार व संघाचे सहसचिव लोकेश पारखी यांनी विशेष परिश्रम घेतले. नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत सातत्याने पाठपुरावा करत त्यांनी उपक्रम सुरळीत पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
यावेळी डिजिटल मीडिया राजुरा अध्यक्ष संतोष मेश्राम, संघाचे उपाध्यक्ष सतीश शिंदे, विजय जुलमे, संघटक कैलास कार्लेकर तसेच इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून नागरिकांना मँगो ज्यूस व फळांचे वाटप करत सामाजिक एकतेचा ठोस संदेश दिला.
एकंदरीत, आंबेडकर जयंतीनिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम केवळ सेवा कार्यापुरता मर्यादित न राहता सामाजिक जागृती, ऐक्य आणि सकारात्मक परिवर्तनाला चालना देणारा ठरला.


