दारूबंदी विभागाला मांगली दिसत नाही का? अवैध दारूविक्रीच्या तक्रारींनी ग्रामस्थ संतप्त; पोलीस अधीक्षकांकडे धाव
भद्रावती, न्यूज डेस्क ✍️
भद्रावती तालुक्यातील मांगली गावात कथित अवैध व विनापरवाना दारूविक्री सुरू असल्याच्या तक्रारींमुळे ग्रामस्थांनी थेट पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्याकडे निवेदन सादर करून कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी) विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावात अवैध दारूविक्रीबाबत सातत्याने चर्चा होत असताना संबंधित यंत्रणांकडून अपेक्षित परिणाम दिसून आले नाहीत. त्यामुळे दारूबंदी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात असताना नागरिकांना थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव घ्यावी लागणे ही बाब गंभीर असल्याची भावना व्यक्त होत आहे.
निवेदनाची दखल घेत पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी तातडीने भद्रावती पोलीस ठाण्याशी संपर्क साधून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. तसेच गाव दारूमुक्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे समजते.
निवेदन सादर करतेवेळी सरपंच धनराज पायघन, उपसरपंच ज्योती झीलपे, सदस्य प्राची आमटे, भीमराव वानखेडे, गुरुदेव सेवा मंडळाचे नामदेव खारकर, तंटामुक्त समिती सदस्य अरविंद वानखेडे, दारूबंदी समिती सदस्य सौ. नागोसे, अश्विना पुनवटकर, अन्नपूर्णा पायघन, प्रेमिला पायघन, कोटनाके, भालचंद्र बोढे तसेच सामाजिक क्षेत्रात सक्रिय सतीश कांबळे गुरुजी उपस्थित होते.
दरम्यान, ग्रामस्थांचा सवाल मात्र थेट दारूबंदी विभागाकडे आहे. गावात अवैध दारूविक्रीबाबत चर्चा आणि तक्रारी होत असतील, तर विभागाला त्याची माहिती नव्हती का? माहिती होती तर ठोस कारवाई का दिसली नाही? आणि कारवाई झाली असेल तर नागरिकांमध्ये नाराजी का कायम आहे? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याची मागणी होत आहे.
गावातील महिलांनीही अवैध दारूमुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक आणि सामाजिक नुकसान होत असल्याची खंत व्यक्त केली आहे. तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याची चिंता व्यक्त करत त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
आता पोलीस अधीक्षकांच्या निर्देशांनंतर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात दारूबंदी विभागाची भूमिका आणि कार्यवाही याबाबतचे प्रश्न अद्याप कायम आहेत. मांगलीतील नागरिकांना आता आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कारवाईची अपेक्षा असून, अवैध दारूविक्रीविरोधातील लढा आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
दारूबंदी विभागाला विचारले जाणारे प्रश्न वाढत आहेत; उत्तरांची प्रतीक्षा अजूनही कायम आहे… या प्रकरणातील काही महत्त्वाच्या बाबींचा उलगडा पुढील भागात.
,,,,,,


