Friday, June 5, 2026

भद्रावतीचा “खर्रा” राज्यभर चर्चेत; FDAचा बडगा कधी?

तुकाराम मुंढे यांच्या धडक मोहिमेनंतर भद्रावतीतील तंबाखूजन्य पदार्थ व्यवसायावरही कारवाईची मागणी

भद्रावती, न्यूज डेस्क ✍️

शंकर बोरघरे, 95 52 61 25 55

भद्रावती तालुक्यात तयार होणारा आणि “भद्रावती खर्रा” या नावाने ओळखला जाणारा तंबाखूजन्य पदार्थ आज केवळ चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे, तर जिल्ह्याबाहेरही चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक वर्षांपासून या व्यवसायाने मोठे स्वरूप धारण केल्याची चर्चा असून, राज्यभर प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सुरू केलेल्या धडक कारवायांच्या पार्श्वभूमीवर भद्रावतीतील खर्रा व्यवसायाकडेही प्रशासनाचे लक्ष वेधले जात आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थ, गुटखा, सुगंधित तंबाखू आणि प्रतिबंधित पदार्थांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये धाडी टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुरवठादार आणि विक्रेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता भद्रावतीतील तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन व विक्री साखळीचीही चौकशी व्हावी, अशी मागणी पुढे येत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, भद्रावती परिसरात विविध नावांनी खर्र्याची निर्मिती आणि विक्री केली जाते. या उत्पादनाचा पुरवठा केवळ तालुका किंवा जिल्ह्यापुरता मर्यादित नसून बाहेरील भागातही होत असल्याची चर्चा आहे. अनेक ठिकाणी खुलेआम विक्री होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, संबंधित विभागांनी याची दखल घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, एकेकाळी वाहन चालक, मजुरी करणारे किंवा लहान-मोठे व्यवसाय करणारे काही व्यक्ती आज मोठ्या आर्थिक सामर्थ्याचे मालक झाल्याची चर्चा परिसरात रंगत आहे. काहींच्या नावावर आलिशान घरे, महागड्या चारचाकी वाहने, व्यावसायिक संकुले आणि मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्ता असल्याचे बोलले जात आहे. या संपत्तीचा स्रोत नेमका काय, या प्रश्नावरही नागरिकांकडून चर्चा होत असून संबंधित यंत्रणांनी याची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हे कर्करोग, हृदयरोग, तोंडाचे विकार आणि इतर गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे अशा पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर नियंत्रण ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

राज्यात मोठमोठ्या तंबाखू माफियांवर कारवाई होत असताना भद्रावतीतील कथित खर्रा व्यवसायावर अद्याप मोठ्या प्रमाणात कारवाई झालेली नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे उत्पादन केंद्रे, कच्च्या मालाचा पुरवठा, विक्री जाळे, आर्थिक उलाढाल आणि कर व्यवहार यांची चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत पुढे येत आहे.

दरम्यान, भद्रावतीतील खर्रा व्यवसायाबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू असली तरी या सर्व बाबींची सत्यता चौकशीअंतीच स्पष्ट होऊ शकते. मात्र राज्यभर सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर भद्रावतीकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन, महसूल विभाग, पोलीस प्रशासन तसेच इतर संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे या प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी जोर धरत आहे.

भाजयुमोचे सचिव रूपेश मांढरे यांनी आरोप केला की, “भद्रावतीतील खर्रा व्यवसायाची सखोल चौकशी झाल्यास अनेक मोठी नावे आणि आर्थिक व्यवहार समोर येऊ शकतात. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या साखळीची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. प्रशासनाने याप्रकरणी मौन न बाळगता ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.”

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!