Friday, June 5, 2026
Homeभद्रावतीभद्रावतीचा ‘खर्रा’ राज्यभर चर्चेत; FDAची नजर कधी वळणार?

भद्रावतीचा ‘खर्रा’ राज्यभर चर्चेत; FDAची नजर कधी वळणार?

भद्रावतीचा “खर्रा” राज्यभर चर्चेत; FDAचा बडगा कधी?

तुकाराम मुंढे यांच्या धडक मोहिमेनंतर भद्रावतीतील तंबाखूजन्य पदार्थ व्यवसायावर कारवाईची मागणी

भद्रावती, न्यूज डेस्क ✍️

शंकर बोरघरे, 95 25 61 25 55

राज्यभर प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि भेसळयुक्त पदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाया सुरू असताना, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे तयार होणारा आणि “भद्रावती खर्रा” म्हणून ओळखला जाणारा तंबाखूजन्य पदार्थ पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या व्यवसायाने मोठे स्वरूप धारण केल्याची चर्चा असून, या संपूर्ण साखळीची सखोल चौकशी करण्याची मागणी आता विविध स्तरांतून पुढे येत आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू तसेच भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात मोठ्या प्रमाणावर मोहीम राबविली आहे. विविध जिल्ह्यांमध्ये धाडी टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर भद्रावतीतील कथित खर्रा उत्पादन, साठवणूक व वितरण व्यवस्थेचीही चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, भद्रावती परिसरात विविध नावांनी खर्र्याचे उत्पादन व विक्री केली जाते. या उत्पादनाचा पुरवठा केवळ तालुका किंवा जिल्ह्यापुरता मर्यादित नसून इतर जिल्हे आणि राज्यातील विविध भागांपर्यंत होत असल्याची चर्चा आहे. अनेक ठिकाणी खुलेआम विक्री होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

यासोबतच या व्यवसायातून काही व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रगती साधल्याची चर्चा परिसरात रंगत आहे. एकेकाळी साधारण व्यवसाय किंवा मजुरी करणाऱ्या काही व्यक्ती आज कोट्यवधींच्या मालमत्तेच्या मालक झाल्याचे बोलले जात आहे. आलिशान घरे, महागडी वाहने, व्यावसायिक संकुले आणि स्थावर मालमत्तेतील गुंतवणूक यामुळे त्यांच्या संपत्तीच्या स्रोताबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.

आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हे कर्करोग, हृदयरोग, तोंडाचे विकार आणि इतर गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे अशा पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर नियंत्रण ठेवणे ही केवळ कायदेशीर नव्हे तर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

राज्यातील अनेक भागांत तंबाखू माफियांविरोधात कारवाई होत असताना भद्रावतीतील कथित खर्रा व्यवसायावर मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्याचे चित्र अद्याप दिसून आले नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे उत्पादन केंद्रे, कच्च्या मालाचा पुरवठा, विक्री जाळे, आर्थिक उलाढाल, कर व्यवहार तसेच संबंधित परवानग्यांची तपासणी करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, या सर्व चर्चांची सत्यता अधिकृत चौकशी आणि तपासाअंतीच स्पष्ट होऊ शकते. मात्र वाढत्या चर्चांमुळे आणि नागरिकांकडून होत असलेल्या मागण्यांमुळे अन्न व औषध प्रशासन, महसूल विभाग, पोलीस प्रशासन तसेच इतर संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे वस्तुस्थितीची पडताळणी करून जनतेसमोर सत्य आणावे, अशी मागणी जोर धरत आहे.

“निष्पक्ष चौकशी झाली तर मोठी नावे समोर येऊ शकतात” – रूपेश मांढरे

या संदर्भात भाजयुमोचे जिल्हा सचिव रूपेश मांढरे यांनी प्रशासनाकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी आरोप केला की, “भद्रावतीतील खर्रा व्यवसायाची निष्पक्ष व सर्वंकष चौकशी झाल्यास अनेक मोठी नावे, आर्थिक व्यवहार आणि पुरवठा साखळी समोर येऊ शकते. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या कथित व्यवस्थेचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी. प्रशासनाने मौन बाळगण्याऐवजी ठोस भूमिका घेऊन जनतेसमोर वस्तुस्थिती मांडणे गरजेचे आहे.”

यामुळे आता राज्यभर सुरू असलेल्या FDAच्या धडक मोहिमेचा पुढचा टप्पा भद्रावतीकडे वळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous article
spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!