Sunday, July 5, 2026
Homeभद्रावतीबोरगाव धांडेतील मनमिळाऊ युवकाचा संशयास्पद मृत्यू; परिसरात खळबळ

बोरगाव धांडेतील मनमिळाऊ युवकाचा संशयास्पद मृत्यू; परिसरात खळबळ

बोरगाव धांडे येथील मनमिळाऊ युवकाचा संशयास्पद मृत्यू

सागरा शमशानभूमी रोडवर ३८ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला; मृत्यूचे गूढ कायम

भद्रावती, न्यूज डेस्क ✍️

भद्रावती तालुक्यातील सागरा गावाजवळील शमशानभूमी लगतच्या रस्त्यावर ३८ वर्षीय युवकाचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रशांत पंढरी चौधरी (वय ३८, रा. बोरगाव धांडे) असे मृत युवकाचे नाव असून त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सागरा गावाजवळील निर्जन रस्त्यालगत प्रशांत चौधरी यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच शेगाव (बु.) पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

शवविच्छेदनानंतर प्रशांत चौधरी यांच्यावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनास्थळी मृतकाची दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी अवस्थेत आढळून आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हा अपघात आहे की अन्य काही प्रकार, याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती आहे.

या संदर्भात शेगाव (बु.) पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल. तपास सुरू असून सर्व बाबींची पडताळणी करण्यात येत आहे.”

प्रशांत चौधरी हे मनमिळाऊ स्वभावाचे व सर्वांशी मिळून-मिसळून राहणारे युवक म्हणून परिसरात परिचित होते. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे बोरगाव धांडे, सागरा आणि परिसरात शोककळा पसरली आहे. मृत्यूचे खरे कारण समोर यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, घटनास्थळाची परिस्थिती, निर्जन रस्त्यावर आढळलेला मृतदेह आणि बाजूलाच उभी असलेली दुचाकी यामुळे या प्रकरणाबाबतचा संशय अधिकच गडद झाला आहे. पोस्टमार्टम अहवाल, तांत्रिक तपास आणि पोलिस चौकशीनंतरच या गूढ मृत्यूमागील सत्य समोर येणार आहे.

क्रमशः…

प्रशांत चौधरी यांच्या संशयास्पद मृत्यूमागे नेमके काय दडले आहे? मृत्यूपूर्वीच्या त्यांच्या हालचाली काय होत्या? घटनास्थळावरील परिस्थिती नेमकी काय सांगते? आणि तपासात कोणते नवे धागेदोरे समोर येत आहेत?

या प्रकरणातील काही महत्त्वाच्या बाबी, स्थानिकांकडून समोर आलेली माहिती आणि तपासाची पुढील दिशा याबाबतचा सविस्तर आढावा पुढील भागात…

फक्त रोखठोक ऑनलाईन न्यूज मध्ये…

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!