राजस्थानात लपला, पण भद्रावती पोलिसांच्या जाळ्यात अडकला! NDPS प्रकरणातील फरार आरोपी 1,000 किमी दूरून जेरबंद
राजस्थानातील पाली जिल्ह्यातून आरोपीला अटक
भद्रावती न्यूज डेस्क ✍️
अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला तब्बल एक हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या राजस्थान राज्यातून अटक करण्यात भद्रावती पोलिसांना मोठे यश आले आहे. राज्याच्या सीमेपलीकडे जाऊन करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करीविरोधातील तपासाला महत्त्वपूर्ण गती मिळाली आहे.
पोलीस स्टेशन भद्रावती येथे दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 632/2026 मधील कलम 8(c), 22(c) व 29 एनडीपीएस कायदा अंतर्गत पाहिजे असलेला आरोपी आकिब जावेद उर्फ टिपू सलमान खान (वय 30 वर्षे), रा. मारवाड जंक्शन, जिल्हा पाली, राजस्थान हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता.
आरोपीचा शोध घेण्यासाठी भद्रावती पोलिसांचे विशेष पथक राजस्थान येथे रवाना करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा शोधण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर राजस्थान राज्यातील मारवाड जंक्शन, जिल्हा पाली येथून आरोपीला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेण्यात आले.
अटकेनंतर आरोपीस माननीय न्यायालय, सोजत (राजस्थान) येथे हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीच्या ताब्यासाठी दोन दिवसांचा ट्रान्झिट वॉरंट मंजूर केला असून पुढील तपासासाठी त्याला भद्रावती येथे आणण्याची कार्यवाही सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार व पोलीस अंमलदार प्रेमकुमार बावणकर यांनी विशेष परिश्रम घेत आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळविले.
राज्याबाहेर जाऊन आरोपीला अटक करण्याची ही कारवाई भद्रावती पोलिसांच्या तपास कौशल्याची आणि समन्वय क्षमतेची प्रचिती देणारी ठरली आहे. आरोपीच्या चौकशीतून अमली पदार्थ तस्करीच्या साखळीतील आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


