कोयना गेटजवळ अवैध मद्यपान अड्ड्यावर धाड
ग्राहकांसह अड्डा चालकाविरुद्ध गुन्हा; 21 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त
चंद्रपूर, न्यूज डेस्क ✍️
अवैध मद्यविक्री आणि मद्यपान अड्ड्यांविरोधातील मोहिमेला गती देत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरोरा पथकाने शनिवारी ताडोबा रोडवरील कोयना गेट परिसरात धडक कारवाई केली. रस्त्याच्या कडेला उभारलेल्या अस्थायी टिनाच्या झोपडीत सुरू असलेल्या अवैध मद्यविक्री व मद्यपान अड्ड्यावर टाकलेल्या या धाडीत ग्राहकांसह अड्डा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 21 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान सदर ठिकाणी कोणतीही वैध परवानगी नसताना मद्यविक्री सुरू असल्याचे तसेच ग्राहकांना मद्यपानासाठी आवश्यक साहित्य व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे निदर्शनास आले.
धाडीत मुकेश मधुकर रामटेके, विकास विठोबा किरमीरे, राजेश चंद्रकांत वाघ आणि अंबादास नानाजी थेरे हे चौघे ग्राहक प्रत्यक्ष मद्यपान करताना आढळून आले. तसेच आशिष नत्थुजी खोब्रागडे हा ग्राहकांना मद्यपानासाठी आवश्यक सुविधा पुरवित असल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 च्या कलम 65, 68 व 84 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व ग्राहकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून अहवालात त्यांनी मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संबंधितांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
या कारवाईत 200 सीलबंद देशी दारूच्या बाटल्या, विविध प्रकारच्या व्हिस्कीच्या 29 बाटल्या असा 15 हजार 270 रुपयांचा मद्यसाठा, काउंटरवरील 2 हजार 750 रुपयांची रोख रक्कम तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 21 हजार 950 रुपये असल्याची माहिती विभागाने दिली.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत भरारी पथकाचे निरीक्षक दत्तात्रय वरठी, दुय्यम निरीक्षक प्रमोद राजोते, सचिन पोलेवार, सोमेश्वर गव्हारे तसेच जवान जगदीश मस्के, अमोल भोयर, रामचंद्र अम्मावार, संजयकुमार हरीनखेडे, सुजित चिकाटे, महिला जवान सुकेशनी कारेकर आणि विलास महाकुलकर यांनी सहभाग घेतला.
नागरिकांना आवाहन
परिसरात अवैध दारू विक्री, मद्यपान अड्डे अथवा सार्वजनिक ठिकाणी मद्यपान सुरू असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक 8422001133 वर त्वरित माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले.


