राजस्थानातून अंमली पदार्थ प्रकरणातील आरोपी जेरबंद; भद्रावती पोलिसांची धडक कारवाई
“राजस्थानात लपला, पण भद्रावती पोलिसांच्या जाळ्यातून सुटला नाही!”
भद्रावती न्यूज डेस्क ✍️
अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात भद्रावती पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत NDPS प्रकरणातील फरार आरोपीला थेट राजस्थानातून अटक केली आहे. तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि सातत्यपूर्ण तपासाच्या बळावर पोलिसांनी हजारो किलोमीटर दूर जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्याने अंमली पदार्थ तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक ६३२/२०२६ अंतर्गत गुंगीकारक औषधीद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act) १९८५ च्या कलम ८(क), २२(क) व २९ अन्वये गुन्हा दाखल असून त्याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपी अब्दुल सिराज अब्दुल गफ्फार याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान आणि तांत्रिक विश्लेषणातून आकिब जावेद उर्फ टिपू सलीम जावेद खान (वय ३०), रा. मारवाड जंक्शन, जि. पाली, राजस्थान याचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक राजस्थान राज्यातील पाली जिल्ह्यात रवाना करण्यात आले. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने शोधमोहीम राबवून दि. १९ जून २०२६ रोजी सकाळी ८.२० वाजता आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपासासाठी भद्रावती येथे आणण्याकरिता दोन दिवसांचा ट्रान्झिट वॉरंट प्राप्त करण्यात आला. त्यानुसार आरोपीला भद्रावती येथे आणण्यात आले असून त्याच्याकडून अंमली पदार्थांचा स्रोत, पुरवठा साखळी, मोबाईल व इलेक्ट्रॉनिक पुरावे तसेच या रॅकेटमधील इतर संशयितांबाबत सखोल चौकशी सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल, पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि बलराम झाडोकार यांच्या तांत्रिक सहाय्याने पोउपनि संतोष केदार, पोशी प्रेमकुमार, पोहवा संतोष येलपुरवार व जयसिंह यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली.


