जागरूक जनता, सकारात्मक राजकारण आणि तत्पर प्रशासनाचा विजय; अखेर सार्वजनिक जागेवरील अतिक्रमणावर बुलडोझर!
सोशल मीडियावरील जनआक्रोश, नागरिकांचा पाठपुरावा, भाजयुमोच्या निवेदनाची दखल; नगरपरिषदेची धडक कारवाई, अतिक्रमण भुईसपाट
चंद्रपूर न्यूज डेस्क ✍️
वार्ता विशेष;
प्रा. महेश पानसे
मूल :- मूल शहरात सार्वजनिक हितासाठी नागरिकांची जागरूकता, राजकीय पक्षांची सकारात्मक भूमिका आणि नगरपरिषद प्रशासनाची तत्परता यांचा उत्कृष्ट संगम पाहायला मिळाला. नगरपरिषदेच्या मालकीच्या सार्वजनिक जागेवर उभारण्यात आलेल्या मोठ्या अवैध बांधकामावर अखेर जेसीबी चालवत धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला असून, नगरपरिषद प्रशासनाने जनहिताची बांधिलकी कृतीतून सिद्ध केली आहे.
मूल शहरातील अद्ययावत आठवडी बाजारालगत (जुने गोंडी विहीरगाव क्षेत्र) नगरपरिषदेच्या मालकीच्या भूमापन क्रमांक ७१ वरील सार्वजनिक जागेवर अनेक वर्षांपासून बेकायदेशीर खरेदी-विक्री होत असल्याची चर्चा शहरात होती. याच जागेवर मोठे व्यावसायिक गाळ्याचे अवैध बांधकाम सुरू असल्याचा मुद्दा जागरूक नागरिकांनी सोशल मीडियावर उचलून धरला. १७ व १८ जून रोजी हा विषय चांगलाच गाजला आणि नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली.
नगरपरिषद प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत कागदपत्रांची पडताळणी केली. त्यानंतर २२ जून रोजी संबंधित बांधकामधारकाला तीन दिवसांत बांधकाम हटविण्याची नोटीस बजावत काम थांबविण्यात आले. मात्र, केवळ नोटीस देऊन विषय संपणार नसल्याने नागरिकांनी संपूर्ण अतिक्रमण हटविण्याची मागणी कायम ठेवली.
या मागणीला बळ देत भारतीय जनता युवा मोर्चाने राजकारण बाजूला ठेवून सकारात्मक भूमिका घेत नगरपरिषदेला निवेदन सादर केले. भाजयुमोचे उपाध्यक्ष सूरज मांदाडे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटविण्याची जोरदार मागणी करण्यात आली. संबंधित प्रभागाचे नगरसेवक नितीन गद्देवार यांनीही सातत्याने पाठपुरावा करून प्रशासनाचे लक्ष वेधले.
अखेर २५ जून रोजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप दोडे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण अवैध पक्के बांधकाम जमीनदोस्त केले. एवढ्यावरच न थांबता भूमापन क्रमांक ७१ वरील इतर अतिक्रमणधारकांनाही नोटिसा बजावून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण करून नियमांना हरताळ फासणाऱ्यांना प्रशासनाने स्पष्ट संदेश दिला आहे की, सार्वजनिक जागेवर कोणाचाही बेकायदेशीर कब्जा सहन केला जाणार नाही. नागरिकांचा पाठपुरावा, विरोधी पक्षाची विधायक भूमिका आणि प्रशासनाची तातडीची कारवाई यामुळे मूल शहरात लोकसहभागाचे एक आदर्श उदाहरण निर्माण झाले आहे.
शहरहितासाठी जागरूक नागरिक, सकारात्मक राजकारण आणि जबाबदार प्रशासन एकत्र आले तर कोणतीही सार्वजनिक समस्या मार्गी लागू शकते, हे मूल शहराने कृतीतून दाखवून दिल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.


