Saturday, July 4, 2026
Homeभद्रावतीभद्रावतीत मुस्लीम समाजाची नाजिया इलाही खान यांच्याविरोधात पोलीसांत लेखी तक्रार; कठोर कायदेशीर...

भद्रावतीत मुस्लीम समाजाची नाजिया इलाही खान यांच्याविरोधात पोलीसांत लेखी तक्रार; कठोर कायदेशीर कारवाईची मागणी

भद्रावतीत मुस्लीम समाजाची नाजिया इलाही खान यांच्याविरोधात पोलीसांत लेखी तक्रार; कठोर कायदेशीर कारवाईची मागणी

सोशल मीडियावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप; निष्पक्ष चौकशीसह गुन्हा दाखल करण्याची मागणी

भद्रावती न्यूज डेस्क ✍️

भद्रावती येथील मुस्लीम समाजाच्या वतीने श्रीमती नाजिया इलाही खान यांच्या विरोधात भद्रावती पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोशल मीडिया व इतर डिजिटल माध्यमांवर प्रसारित झालेल्या एका कथित व्हिडिओ अथवा पॉडकास्टमध्ये इस्लाम धर्म, हजरत मुहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) तसेच उम्मुल मोमिनीन हजरत आयशा (रज़ियल्लाहु अन्हा) यांच्याबाबत आक्षेपार्ह व भडकाऊ वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, संबंधित कथित वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असून समाजात धार्मिक तेढ निर्माण होण्याची तसेच सार्वजनिक शांतता आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात संबंधित व्हिडिओ, ऑडिओ, सोशल मीडिया पोस्ट तसेच इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे सुरक्षित ठेवून त्यांची तांत्रिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १९६, २९९, ३५३ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० आणि इतर लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

हे निवेदन भद्रावती पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक केदार व पोलीस उपनिरीक्षक वर्मा यांनी स्वीकारले. यावेळी समाजातील विविध मान्यवरांसह मोठ्या संख्येने मुस्लीम समाजबांधव उपस्थित होते. निवेदनासोबत अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्याही जोडण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नसून, पोलीस तक्रारीची पडताळणी करून कायद्यानुसार पुढील कार्यवाही करतील, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!