Saturday, July 4, 2026
Homeचंद्रपूरमहामार्ग पोलिसांच्या तत्परतेने वाचले चालकाचे प्राण; ऑपरेशन यू-टर्नदरम्यान मानवतेचे दर्शन

महामार्ग पोलिसांच्या तत्परतेने वाचले चालकाचे प्राण; ऑपरेशन यू-टर्नदरम्यान मानवतेचे दर्शन

वेळीच धावले महामार्ग पोलीस; हृदयविकाराचा झटका आलेल्या चालकाचे प्राण वाचले

ऑपरेशन यू-टर्नदरम्यान मानवतेचे दर्शन; महामार्ग पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक

चंद्रपूर , न्यूज डेस्क ✍️

चंद्रपूर महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावत असताना दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे हृदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या एका वाहनचालकाचे प्राण वाचल्याची घटना शनिवारी (२७ जून) घडली. महामार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे वेळेवर उपचार मिळाल्याने चालकाला जीवदान मिळाले.

महामार्ग पोलीस मदत केंद्र, चंद्रपूर येथील पोलीस हवालदार संजय थेरे, पोलीस नाईक राकेश हेडाऊ आणि पोलीस नाईक वकील राठोड हे कोंढा फाटा येथे ‘ऑपरेशन यू-टर्न’ मोहिमेदरम्यान कर्तव्य बजावत होते. त्याचवेळी वरोरा येथून चंद्रपूरकडे येत असलेल्या कारचालकाला अचानक छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. चालकाने तातडीने महामार्ग पोलिसांकडे मदतीची विनंती केली.

क्षणाचाही विलंब न करता पोलीस हवालदार संजय थेरे यांनी एमटीए माईन येथील एका कर्मचाऱ्याच्या मदतीने चालकाला तातडीने चंद्रपूर येथील डॉ. वरगंटीवार यांच्या रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत गुंजेवार (वय ४०), व्यवसाय – ठेकेदारी, रा. स्नेहनगर, गजानन मंदिर वॉर्ड, चंद्रपूर यांना योग्य वेळी रुग्णालयात आणण्यात आल्याने त्यांचे प्राण वाचविणे शक्य झाले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.

रुग्णाचे नातेवाईक तसेच डॉ. वरगंटीवार यांनी महामार्ग पोलिसांच्या तत्परता, संवेदनशीलता आणि मानवतावादी भूमिकेचे कौतुक करत मनःपूर्वक आभार मानले.

ही संपूर्ण कार्यवाही महामार्ग पोलीस मदत केंद्र, चंद्रपूरच्या प्रभारी अधिकारी सपोनि माया चाटसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कर्तव्याबरोबरच मानवतेचे दर्शन घडविणाऱ्या महामार्ग पोलिसांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!