भद्रावतीची राष्ट्रीय स्तरावर दखल! नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रतिष्ठेचे NQAS मानांकन
✍️भद्रावती, न्यूज डेस्क
Shankar Borghare, 95 25 61 25 55
भद्रावती शहरासाठी अभिमानाची आणि आरोग्य क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणारी बातमी समोर आली आहे. येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राने केंद्र शासनाचे प्रतिष्ठेचे राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (NQAS) मिळवत राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आरोग्य सेवा, रुग्णाभिमुख सुविधा, स्वच्छता, व्यवस्थापन, गुणवत्ता नियंत्रण आणि सेवा वितरण या सर्व निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत केंद्राने हे मानांकन पटकावले. त्यामुळे भद्रावतीतील शासकीय आरोग्य सेवेवर केंद्र शासनाने गुणवत्ता आणि विश्वासार्हतेची अधिकृत मोहोर उमटवली आहे.
या यशामागे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय आसुटकर यांचे नेतृत्व, डॉ. आशिष देवतळे, डॉ. शाहीन सय्यद, डॉ. रितेश देवतळे आणि डॉ. दीप्ती मोहितकर यांचे मार्गदर्शन, तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, परिचारिका आणि आशा भगिनींचे सातत्यपूर्ण परिश्रम मोलाचे ठरले.
या प्रक्रियेत स्थानिक प्रशासनानेही महत्त्वाची भूमिका बजावली. नगराध्यक्ष प्रफुल चटकि आणि मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळके यांनी आवश्यक सुविधा व प्रशासकीय सहकार्य उपलब्ध करून देत गुणवत्ता सुधार मोहिमेला बळ दिले.
NQAS मानांकन हे दर्जेदार, सुरक्षित आणि लोकाभिमुख आरोग्य सेवेचे राष्ट्रीय प्रमाणपत्र मानले जाते. हे मानांकन मिळाल्याने भद्रावतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, आरोग्य विभागाच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
रोखठोक अभिनंदन! नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, भद्रावतीच्या संपूर्ण टीमने मिळवलेले हे यश भविष्यातील आरोग्य सेवेसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.


