Friday, September 4, 2026
Homeचंद्रपूररेती वाहतुकीचा ‘गेम’ फसला; शामकांत थेरे-रितीक रामटेकेंची वाहने पोलिसांच्या ताब्यात!

रेती वाहतुकीचा ‘गेम’ फसला; शामकांत थेरे-रितीक रामटेकेंची वाहने पोलिसांच्या ताब्यात!

शामकांत थेरेचा हायवा पोलिसांचा ताब्यात, रितीक रामटेकेंचा ट्रॅक्टर पकडला; भद्रावती पोलिसांनी दोन्ही ‘रेती एक्स्प्रेस’ पकडल्या!

दोन दिवसांत ३९ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त; हायवा-ट्रॅक्टरसह अवैध रेतीवर पोलिसांचा दणका

भद्रावती, न्यूज डेस्क,  शंकर बोरघरे,95 52 61 25 55 

रेती भरून रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांना भद्रावती पोलिसांनी सलग दोन दिवसांत चांगलाच ‘ब्रेक’ लावला. १ सप्टेंबर रोजी चिरादेवी रोडवर हायवा तर २ सप्टेंबर रोजी मांगली-भद्रावती मार्गावर ट्रॅक्टर पकडण्यात आला. या दोन्ही कारवायांत वाहनांसह अवैध रेती असा तब्बल ३९ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर बातमी पोलिसांकडून मीळालेल्या माहितीनुसार आहेत.

१ सप्टेंबर रोजी भद्रावती पोलिसांना चिरादेवीकडून भद्रावतीच्या दिशेने अवैध रेती भरून हायवा येत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी चिरादेवी रोडवर नाकाबंदी केली. MH 34 BG 2255 क्रमांकाचा हायवा अडवून तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे सात ब्रास रेती आढळली.

रेती वाहतुकीसाठी आवश्यक शासकीय रॉयल्टी किंवा परवाना नसल्याचे तपासात आढळले. डोंगरगाव, सिंदेवाही परिसरातून रेती अवैधपणे उत्खनन करून विक्रीसाठी आणली जात असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या कारवाईत हायवा आणि रेती असा ३५ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पहिल्या कारवाईचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच दुसऱ्या दिवशी पुन्हा रेतीची ‘दौड’ सुरू झाली. २ सप्टेंबर रोजी मांगलीकडून भद्रावतीकडे ट्रॅक्टरमधून अवैध रेती आणली जात असल्याची माहिती डीबी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मांगली ते भद्रावती मार्गावर नाकाबंदी केली.

पहाटे चार वाजताच्या सुमारास ट्रॅक्टरला थांबण्याचा इशारा करण्यात आला. मात्र चालकाने ट्रॅक्टर न थांबवता पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून अखेर जवळे प्लॉट परिसरात ट्रॅक्टर अडवला. तपासणी केली असता ट्रॉलीमध्ये सुमारे एक ब्रास रेती आढळली. रॉयल्टी नसल्याने ट्रॅक्टर-ट्रॉली आणि रेती असा ४ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अवैध रेती वाहतुकीच्या या दोन्ही कारवायांमध्ये भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या कारवाया परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा भद्रावती पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.

कारवाईमध्ये पोलीस हवालदार देवानंद डुकरे, प्रशांत शेंदरे, अनूप आष्टणकर, गोपाल आतकुलवार, विजय तलांडे आणि महिला पोलीस अंमलदार मोणाली गारघाटे यांनी सहभाग घेतला.

दोन दिवसांत दोन वाहने आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त झाल्याने अवैध रेती वाहतुकीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. पोलिसांची नाकाबंदी पाहता रेती वाहतूकदारांनी आता ‘रेती कुठून आणायची?’ यापेक्षा ‘पोलिसांच्या नजरेतून कसे सुटायचे?’ याचाच विचार करावा लागणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!