Sunday, September 13, 2026
Homeचंद्रपूरकामे झाली, मोजमाप झाले; तरीही शेतकऱ्यांच्या हातात बिलाची रक्कम नाही!

कामे झाली, मोजमाप झाले; तरीही शेतकऱ्यांच्या हातात बिलाची रक्कम नाही!

कामे पूर्ण; बिलासाठी मात्र लाभार्थ्यांची फरफट!

समृद्धी बजेटच्या प्रक्रियेत सिंचन विहीर, गोठे व शेडची देयके रखडली; कर्ज काढून काम करणारे शेतकरी हवालदिल

नागभीड तालुका प्रतिनिधी;  यशवंत निकुरे

नागभीड तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकरी लाभार्थ्यांची देयकांसाठी फरफट सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. सिंचन विहीर, गुरांचा गोठा, शेळीपालन शेड, कुक्कुटपालन शेड यांसह विविध कामे मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून पंचायत समितीत फाईल जमा केली. मात्र अंदाजपत्रक व पुढील प्रशासकीय प्रक्रियेला विलंब होत असल्याने लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

सन २०२४ मध्ये मंजूर झालेल्या कामांच्या पुढील प्रक्रियेत समृद्धी बजेटमध्ये समावेशाचा मुद्दा निर्माण झाल्याने लाभार्थ्यांना पुन्हा प्रशासकीय प्रक्रियेला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार आहे. भविष्यात लाभ मिळेल की नाही, या संभ्रमामुळे अनेकांनी कर्ज काढून अथवा स्वतःच्या पैशातून कामे पूर्ण केली. मात्र कामे पूर्ण झाल्यानंतरही कुशल देयकाची रक्कम वेळेत मिळत नसल्याने कर्जबाजारी लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

काही प्रकरणांत बिलाची प्रक्रिया पूर्ण होऊनही रक्कम प्रत्यक्ष लाभार्थ्यांना मिळण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात येते. निधी व प्रशासकीय प्रक्रियेच्या कारणांमुळे देयके रखडत असल्याने “काम आमचे, कर्ज आमचे आणि बिलासाठी प्रतीक्षाही आमचीच” अशी संतप्त भावना लाभार्थ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

शासनाने नागभीड तालुक्यातील प्रलंबित वैयक्तिक लाभाच्या कामांचा तातडीने आढावा घेऊन पात्र लाभार्थ्यांची देयके नियमाप्रमाणे तत्काळ अदा करावीत. तसेच सन २०२४ मधील मंजूर कामांच्या प्रलंबित प्रक्रियेबाबत स्पष्टता देऊन विलंबास जबाबदार असलेल्या प्रशासकीय बाबींची चौकशी करावी, अशी मागणी शेतकरी लाभार्थ्यांकडून होत आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

काॅपी करू नका..!