- भद्रावती (प्रतिनिधी): शहरातील शास्त्री नगर परिसरातील नालीवरील चेंबरचे झाकण फुटल्याने नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. भद्रावती शहरातील प्रभाग क्र. १४ मधील झोडे यांच्या घरासमोर असलेले चेंबर काही दिवसांपूर्वी नाली सफाई करताना कामगारांच्या हातून तुटले. मात्र नगरपरिषदेकडून अद्याप दुरुस्तीची कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.
उघडे व तुटलेले चेंबर हे रस्त्यावरून जाणाऱ्या महिलां, मुलां आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी गंभीर अपघाताचे केंद्र बनले आहे. दिवसाच्या उजेडातही धोकादायक ठरणारे हे चेंबर रात्रीच्या अंधारात तर सरळ जीवघेणे ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिसरात प्रकाशयोजना नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक वाढली आहे.
नागरिकांनी नगरपरिषदेकडे तक्रारी पाठवल्या असल्या, तरी दुरुस्ती न झाल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. स्थानिक नागरिकांच्या रोखठोक शब्दांत..
“चेंबर तुटून अनेक दिवस झाले तरी प्रशासन हलत का नाही? अपघात झाल्यावरच जाग येणार का?”
अशी तीव्र टीका व्यक्त करण्यात येत आहे.
शास्त्री नगरातील ही समस्या केवळ सुरक्षिततेपुरती मर्यादित नसून, सार्वजनिक आरोग्य आणि प्रशासनाच्या जबाबदारीवरही प्रश्नचिन्ह उभे करते. नागरिकांची मागणी स्पष्ट आहे..!
उघड्या चेंबरवर तात्काळ मजबूत व सुरक्षित झाकण बसवून परिसर सुरक्षित करण्यात यावा.
प्रशासनाने जलद गतीने प्रतिसाद देऊन चेंबरची दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा संभाव्य दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी नगरपरिषदेकडे राहील, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.
- सदरील माहिती अधिकृत नागरिकांकडून प्राप्त झाली असून, दुरुस्ती होईपर्यंत माध्यमामार्फत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.
- “To be continued” …..!


