चंद्रपूर, न्यूज डेस्क ✍️
भद्रावती शहरातील सोलर वीज मीटर धारक ग्राहकांना ऑगस्ट २०२५ पासून नियमित वीज बिल मिळत नसल्याने निर्माण झालेल्या संभ्रम आणि आर्थिक ताणाला लगाम घालण्यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा भद्रावतीने ठाम पावले उचलली आहेत. दि. ०९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण), भद्रावती कार्यालयास निवेदन देत सोलर मीटर ग्राहकांना वेळेवर बिल वितरण करण्याची मागणी केली असून, थकित बिलांची तातडीने वसुली आणि भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी प्रशासकीय पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.
या घडामोडींचा पार्श्वभूमी म्हणजे भद्रावतीतील गौतम नगर परिसरातील अनेक सोलर वीज मीटर ग्राहकांकडून ग्राहक पंचायत कडे दाखल झालेल्या तक्रारी. ऑगस्ट २०२५ पासून सप्टेंबर महिन्यापर्यंतची वीज बिल मिळालेली नसल्याने ग्राहकांमध्ये गोंधळ उडाला असून, दीर्घकाळ बिल न मिळाल्यामुळे आर्थिक भार वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. सोलर ऊर्जाचा वापर वाढवणाऱ्या या ग्राहकांना प्रोत्साहन देण्याऐवजी महावितरणच्या विलंबामुळे त्यांचा विश्वास डळमळत असल्याचे संघटनेने निदर्शनास आणले. विशेषतः रूफटॉप सोलर सिस्टम बसवणाऱ्या कुटुंबांना हे बिल न मिळाल्याने भविष्यात मोठ्या रकमेचे एकरकमी बिल येण्याची शक्यता असते, ज्यामुळे त्यांच्यावर अनावश्यक दबाव येईल, असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
ग्राहक पंचायत ने उपकार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट मागण्या नोंदवल्या आहेत. त्यानुसार, सप्टेंबर २०२५ पासूनची सर्व थकित वीज बिले तातडीने वितरित करावीत, पुढील काळात कोणत्याही महिन्यात बिल वितरणात खंड पडू नये यासाठी आवश्यक प्रशासनिक खबरदारी घ्यावी. तसेच, बिल वितरणाच्या कामात कसूर करणाऱ्या संबंधित खाजगी कंपनी वर योग्य कारवाई करावी, अशी ठाम भूमिका घेतली आहे.
ही मागणी केवळ भद्रावतीपुरती मर्यादित नसून, संपूर्ण चंद्रपूर जिल्हातील सोलर ग्राहकांच्या हितासाठी असल्याचे संघटनेने सांगितले. महाराष्ट्रात सौर ऊर्जाला प्रोत्साहन देणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या योजना राबवल्या जात असताना, स्थानिक पातळीवर अशा समस्या उद्भवणे हे वाईट संकेत असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
या बैठकीस शाखा अध्यक्ष प्रवीण चिमूरकर, उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश हटवार, कोषाध्यक्ष भारत खोब्रागडे, सहसचिव सौ. करूणा मोघे, संघटक सोनल वावरे, सदस्य विनोद ठमके व प्रतिक्षा बनकर उपस्थित होते. त्यांनी महावितरण च्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत तक्रारींचे गांभीर्य स्पष्ट केले. सोलर वीज मीटर धारक ग्राहकांसाठी बिल वितरण प्रक्रिया सुसंगत नसल्याने होणाऱ्या अडचणींवर तातडीने उपाययोजना न केल्यास पुढील टप्प्यात मोठे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, महावितरण ने या तक्रारींची दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सोलर ऊर्जा ग्राहकांची संख्या वाढत असताना, वीज बिल वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणणे गरजेचे ठरले आहे. ही बाब पीएम सूर्य घर योजना सारख्या राष्ट्रीय मोहिमेलाही बळकटी देणारी ठरेल, ज्यामुळे ग्रीन एनर्जी चा प्रसार व्हावा आणि ग्राहकांचा विश्वास वाढेल.


