चंद्रपूर न्यूज डेस्क ✍️
स्थानिक, प्रतिनिधी
भद्रावती तालुक्यातील विजासन रोड ते मुख्य देवालय सोसायटी हा मार्ग गेल्या तीन महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत पडून असल्याने नागरिकांसाठी तो धोकादायक ठरत आहे. खडीकरण करून काम थांबवण्यात आल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी खोल खड्डे पडले असून सैल खडीमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सदर मार्ग हा मुख्य देवालय परिसरात जाण्यासाठी महत्त्वाचा असून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी आणि कामगार या रस्त्याचा वापर करतात. मात्र खडीचे उंचवटे आणि असमतल पृष्ठभाग यामुळे दुचाकी वाहन घसरल्याच्या घटना वाढत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रकाशाच्या अभावामुळे अपघाताचा धोका अधिकच वाढतो.
स्थानिक नागरिकांच्या मते, खडीकरणानंतर डांबरीकरण तातडीने होणे अपेक्षित होते. मात्र संबंधित विभागाकडून कामाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. झालेल्पा पावसामुळे खड्ड्यांची तीव्रता वाढली असून रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिक बिकट होत आहे.
निधी मंजूर असूनही काम रखडल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.


