भद्रावती, न्यूज डेस्क ✍️
चंद्रपूर, नागपूर महामार्गावरील बाळासाहेब ठाकरे गेट समोरील चौकात वाढती वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका लक्षात घेता ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा भद्रावतीच्या वतीने पोलीस प्रशासन यांना निवेदन देण्यात आले.
सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८.३० या गर्दीच्या वेळेत किमान दोन ट्रॅफिक पोलिसांची नियमित नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात आली. चौकातील अनियंत्रित वाहतूक आणि वाढती वाहनसंख्या यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद आहे.
तसेच बस स्टँड चौक ते चंदनखेडा फाटा या भागात जड वाहनांच्या पार्किंगवर बंदी घालून तो परिसर अधिकृतपणे “नो पार्किंग झोन” घोषित करावा, अशी ठोस मागणी करण्यात आली. अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढत असल्याचे ग्राहक पंचायतने स्पष्ट केले.
याशिवाय नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने योग्य ती उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावतीचे अध्यक्ष प्रवीण चिमूरकर, उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश हटवार, कोषाध्यक्ष भारत खोब्रागडे, सहसचिव करुणा मोघे, संघटक सोनल वावरे तसेच सदस्य विनोद ठमके व प्रतिक्षा बनकर उपस्थित होते.


